पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा
कामगार हक्क मंचची राज्य सरकारकडे मागणी
बेळगाव : राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये आऊटसोर्सिंगद्वारे पाणीपुरवठा कर्मचारी काम करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून अतिशय तुटपुंज्या वेतनावर कोणतीही सुरक्षा नसताना काम करत आहेत. यामुळे या पदावर त्यांना कायम करावे या मागणीसाठी गुरुवारी सुवर्ण विधानसौध येथे कामगार हक्क मंच, राज्य नगरपालिका पाणीपुरवठा कर्मचारी, जनरल असोसिएशनतर्फे आंदोलन करण्यात आले. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांसाठी विशेष भरती करून वेतन थेट खात्यामध्ये जमा करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार मासिक वेतन 27 हजार रुपये द्यावे, जर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा कर्मचारी निवृत्त झाले किंवा सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाला तर दहा लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विविध नगरपालिकांमध्ये शेकडो कर्मचारी पाणीपुरवठा विभागात काम करतात. सध्या आऊटसोर्सिंगद्वारे कंत्राटी पद्धतीने ते सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. राज्य सरकारने या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्यास त्यांना सुरक्षा उपलब्ध होणार असल्याचे कामगार हक्क मंचच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.