गायरान जमिनीवर सोलार प्लांट नको
जनावरे चारणे मुश्कील : किटदाळ ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : किटदाळ (ता. सौंदत्ती) येथील गायरान जमिनीवर सोलार प्लांट उभारण्याचा प्रयत्न सुरू असून, याला ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. आर्टगल (ता. सौंदत्ती) ग्राम पंचायत हद्दीतील किटदाळ येथे सध्या असलेल्या गायरान जमिनीवर गावातील जनावरे चारण्यासाठी सोडण्यात येत असतात. या जागेवर सोलार प्लांट उभारल्यास जनावरे चारण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. गायरानची एकूण जमीन 46 एकर 37 गुंठे आहे. यापैकी 8 एकर जमिनीमध्ये समाजकल्याण खात्याची निवासी शाळा आहे. 3 एकर कर्नाटक विद्युत निगमला दिली आहे. 5 एकर 21 गुंठे सरकारी कन्नड शाळेसाठी आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने गायरान जमिनीतीलच एक एकर जागा स्मशानभूमीसाठी देण्यात आली आहे. एकंदरीत 17 एकर 21 गुंठे जागा सरकारच्या ताब्यात आहे. आता उर्वरित 29 एकर 16 गुंठे जागा ही गायरानसाठी आहे. या जागेचा वापर झाल्यास गायरान नष्ट होणार असून गुरे, ढोरे चारण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून किटदाळ ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.