राज्यातील एकही शाळा बंद करणार नाही!
मंत्री मधू बंगारप्पा यांचे विधानपारषिदेत स्पष्टीकरण
बेळगाव : 2025-26 वर्षात 900 सरकारी शाळा केपीएस शाळांमध्ये रुपांतर केल्या जात आहेत. येत्या काळात सर्व ग्रामपंचायतींमध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येकी एक केपीएस (कर्नाटक पब्लिक स्कूल) शाळा सुरू करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. ही योजना सुरू करत असताना आपण शाळा बंद करणार असल्याचे कोठेही सांगितलेले नाही. मात्र, प्रसारमाध्यमांमध्ये शाळा बंदबाबत चुकीची माहिती पसरली गेली आहे. याचे आम्ही खंडन करतो, असे शालेय शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी सांगितले.
विधानपरिषदेत सदस्य चिदानंदगौडा आणि डॉ. उमाश्री यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, आम्ही राज्यात 500 केपीएस शाळा सुरू करणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. सध्या केपीएस शाळांची संख्या वाढत असून याच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. याआधी 309 केपीएस शाळांच्या माध्यमातून 2 लाख 74 हजार 464 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केपीएस शाळांमधील शिक्षकांच्या रिक्तपदासाठी अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आवश्यक ठिकाणी यापुढेही अतिथी शिक्षकांची नियुक्ती केली जाईल.
खासगी शाळांच्या धर्तीवर सुविधा
खासगी शाळांच्या धर्तीवर केपीएस शाळांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात आहेत. खासगी शाळांमध्ये मुलांना संगणक, स्मार्ट क्लासरुम, ये-जा करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येते. याच धर्तीवर या सर्व सुविधा केपीएस शाळांमध्ये पुरविण्यात येणार आहेत. प्रत्येक शाळेत किमान 1,200 विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक आणि पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत, असे मंत्री बंगारप्पा यांनी सांगितले.
योजनेचे स्वागत पण...
केपीएस योजनेचे आम्ही स्वागतच करतो. मात्र या योजनेच्या नावाखाली सरकारने शाळा बंद करून दुसऱ्या शाळा बंद न करण्याची मागणी डॉ. उमाश्री यांनी केली. चिदानंदगौडा यांनी केपीएस योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार सरकारी शाळा संपविण्याचा डाव आखत आहे. तसेच तुटपुंजे अनुदान मंजूर करून या शाळा सुरू करण्यात येत आहेत. किमान 10 ते 15 कोटी रुपये अनुदान मंजूर करून 5 एकर सुसज्ज जागेत केपीएस सुरू कराव्यात. त्याचबरोबर प्रत्येक गावाला ‘एक शाळा, एक मंदिर’ मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.
सर्व सुविधा पुरविणार...
मधू बंगारप्पा म्हणाले, शिक्षणमंत्री या नात्याने आपण कधीही शाळा बंद होतील, असे म्हटलेले नाही. केपीएस योजनेच्या माध्यमातून आम्ही हायटेक शाळा निर्माण करत आहोत. केपीएस योजना ही गोरगरीब मुलांचा विचार करून त्यांना उच्च शिक्षण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. केपीएस शाळेत सर्व सुविधा पुरविण्यात येणार असून राज्यातील एकही शाळा बंद करण्यात येणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.