For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकारणातून संन्यास नाहीच : मायावती

06:46 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजकारणातून संन्यास नाहीच   मायावती
Advertisement

गेस्ट हाउस प्रकरणाचा केला उल्लेख : सप-काँग्रेसला केले लक्ष्य

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

बहुजन समाज पक्षाच्या नव्या अध्यक्षाकरता मंगळवारी निवडणूक होणार आहे. अशास्थितीत बसप सर्वेसर्वा मायावती यांच्या जागी अन्य कुणाला संधी मिळू शकते अशी चर्चा सुरू आहे. या नव्या चेहऱ्यांच्या चर्चेत आकाश आनंद यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. आकाश आनंद हे मायावती यांचे भाचे आहेत. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी सोमवारी अनेक ट्विट केले असून यात राजकारणातील संन्यासावरून सुरू असलेल्या चर्चेवर स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Advertisement

बहुजनांच्या आंबेडकरवादाला कमकुवत करण्याचा विरोधकांचा कट हाणून पाडण्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत बसपच्या आत्मसन्मान अणि स्वाभिमान चळवळीकरता समर्पित राहणार आहे. सक्रीय राजकारणातून संन्यास घेण्याचा माझा कुठलाच विचार नाही. पक्षाने आकाश आनंद यांना माझ्या अनुपस्थितीत किंवा आजारपणात बसपचा उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे, यामुळे जातीयवादी प्रसारमाध्यमे माझ्याबद्दल बनावट बातम्या प्रसारित करत असल्याचा दावा मायावती यांनी केला आहे.

यापूर्वी मला राष्ट्रपती करण्यात येणार असल्याची अफवा पसरविण्यात आली होती. तर काशीराम यांनी राष्ट्रपती होण्याचा अर्थ सक्रीय राजकारणातून सन्यास घेणे असल्याचे म्हणत ही अफवा फेटाळली होती. सक्रीय राजकारणातून बाहेर पडणे काशीराम यांना मान्य नव्हते.  मग त्यांची शिष्य असा निर्णय कसा घेऊ शकेल असे प्रश्नार्थक विधान मायावती यांनी केले आहे.

समाजवादी पक्षाकडून 2 जून 1995 रोजी माझ्यावर जीवघेणा हल्ला करविण्यात आला होता. याप्रकरणी काँग्रेसने कधीच भूमिका मांडलेली नाही. तर त्यावेळी केंद्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने देखील स्वत:ची जबाबदारी पार पाडली नव्हती. तशा स्थितीत काशीराम यांना स्वत:चा आजार बाजूला ठेवत गृहमंत्र्यांना सुनवावे लागले होते. त्यानंतरच काँग्रेस सरकारने पावले उचलली होती. त्या काळात काँग्रेस राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून पडद्या आडून स्वत:चे सरकार चालवू पाहत होता, परंतु काँग्रेसचा हा कट बसपने हाणून पाडला होता असा दावा मायावती यांनी केला आहे.

जातनिहाय जनगणनेची मागणी

बसप अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेसाठी केंद्रात सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस आणि भाजपवर पूर्ण दबाव निर्माण करत राहिला आहे. बसप अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेसाठी आग्रही राहिला आहे. परंतु जातनिहाय जनगणनेनंतर  काँग्रेस अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती तसेच ओबीसींना त्यांचे योग्य हक्क  मिळवून देऊ शकणार का हा खरा प्रश्न आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील वर्गीकरण आणि क्रीमिलेयरवरून काँग्रेस अद्याप मौन बाळगून असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे.

बसप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

बसपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी प्रदेश कार्यालयात होणार आहे. या बैठकीत मायावती यांना पुन्हा पक्षाची धुरा सोपविली जाणार आहे. तसेच राजकीय प्रस्तावही मांडण्यात येणार आहे. या बैठकीत पक्षाचे देशभरातील पदाधिकारी सामील होतील, या पदाधिकाऱ्यांना मायावतींकडून आगामी विधानसभा निवडणूक तसेच उत्तरप्रदेशातील पोटनिवडणुकीवरून महत्त्वाचे दिशानिर्देश देण्यात येणार आहेत.

Advertisement
Tags :

.