कुत्र्यांच्या निर्बिजीकरण निविदेला प्रतिसाद नाहीच
बेळगाव : एकीकडे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र दुसरीकडे चारवेळा कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी निविदा काढूनदेखील ठेकेदार मिळत नसल्याने कुत्र्यांची समस्या वाढतच चालली आहे. त्यामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली असून नागरिकांना भीतीच्या छायेखाली वावरण्याची वेळ आली आहे. बेळगाव शहरात अंदाजे 18 हजार तर बेळगाव जिल्ह्यात 80 हजारहून अधिक भटकी कुत्री आहेत. भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी 2025-26 च्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर महापालिकेने मे ते सप्टेंबर 2025 पर्यंत एकूण चारवेळा 50 लाख रुपयांची निविदा मागविली.
मात्र निविदेत भाग घेण्यासाठी कोणतीही संस्था पुढे येत नाही. काही संस्थांनी पहिल्या आणि दुसऱ्यावेळी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. मात्र निकषाअभावी त्या संस्थांना नाकारण्यात आले असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. निर्बिजीकरणाअभावी कुत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे. शहरातील मारुती गल्ली, शहापूर, वडगाव, कॅम्प परिसर, बाजारपेठ परिसर कॉलेज रोड, केळकर बाग आधी ठिकाणी कुत्र्यांची संख्या वाढली आहे. मुले शाळेला जाताना किंवा घराबाहेर खेळताना त्यांच्यावर कुत्र्यांकडून हल्ला केला जात आहे. इतकेच नव्हे तर वृद्धांनाही लक्ष करून चावा घेतला जात असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. कळप करून फिरणाऱ्या कुत्र्यांना पाहून नागरिक घाबरत असून महापालिकेला शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या जात आहेत.
एका कुत्र्यासाठी अंदाजे 1600 रुपये खर्च
महानगरपालिकेने काढलेल्या निविदा प्रक्रियेत 50 लाख रुपये खर्चातून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करावे लागणार आहे. एका कुत्र्यासाठी अंदाजे 1600 रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे. पण ही रक्कम पुरेशी नसल्याने निविदेला प्रतिसाद न मिळण्यामागचे कारण आहे. निविदा रक्कम वाढवून एका कुत्र्यासाठी 2 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी होत आहे.