For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कचऱ्यासंबंधी कोणताही प्रकल्प कुडचिरेत नको

12:26 PM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
कचऱ्यासंबंधी कोणताही प्रकल्प कुडचिरेत नको
Advertisement

कुडचिरेवासीय आक्रमक : गुरुवारी भूमापनास केला तीव्र विरोध,पोलीस-ग्रामस्थांमध्ये धक्काबुक्की

Advertisement

डिचोली : मये मतदारसंघातील वन म्हावळींगे कुडचिरे या पंचायतक्षेत्रातील कुडचिरे येथे राज्य सरकारच्या कचरा व्यवस्थापन खात्यातर्फे होऊ घातलेल्या ‘कन्स्ट्रक्शन अँड डेब्रीट्स प्लांट’ या प्रकल्पासाठी होणाऱ्या भूमापनास कुडचिरेवासीयांनी रस्त्यावर उतरून काल गुरुवारी तीव्र विरोध केला. कुडचिरे गावात कोणत्याही प्रकारचा कचऱ्यासंबंधीचा प्रकल्प नकोच. आणतच असल्यास कोणताही औद्योगिक प्रकल्प आणा, अशी मागणी करत कुडचिरेवासियांनी भूमापनाचे काम बंद पाडले. यावेळी पोलिस व ग्रामस्थ यांच्यात धक्काबुक्की, शाब्दिक चकमक झाल्याने बराचवेळ वातावरण तंग झाले होते.

सकाळी बाराजण कुडचिरे येथे सुरू झालेल्या या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट कुडचिरेत दाखल झाले. त्यांनी सदर प्रकल्प कोणत्याही प्रकारचा ओला किंवा सुका कचरा प्रक्रिया प्रकल्प नसून तो कन्स्ट्रक्शन अँड डेब्रीट्स प्लांट असल्याचे सांगून आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु या विषयावर आक्रमक बनलेल्या लोकांनी भूमापनाचे काम बंद करा व नंतरच आमच्याशी बोला, असा रेटाच लावला.

Advertisement

 बांधकाम साहित्याचा प्रकल्प

राज्य सरकारतर्फे कुडचिरे बाराजण भागातील महसूली जमीन गेल्या 2019 साली कचरा व्यवस्थापन यंत्रणेकडे हस्तांतरित केली होती. सुमारे 44 हजार चौरस मीटर जमिनीवर कचरा व्यवस्थापन यंत्रणेमार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेब्रीट्स प्लांट आणण्याचा सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीने या जमिनीचे मापन करण्यासाठी काल गुरू. दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळीच भूमापन खात्याचे अधिकारी, मामलेदार व मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा कुडचिरेत दाखल झाला होता.

भूमापनाला जमावाचा विरोध

भूमापनाचे काम सुरू असल्याचे समजताच सुमारे 300 लोकांचा जमाव बाराजण कुडचिरे येथे दाखल झाला. पुरूष, महिलांसह मोठ्या संख्येने युवकांची यावेळी उपस्थिती होती. कुडचिरे हा गाव निसर्गसंपन्न व हिरवळ असलेला असून गोवाभरचा कचरा आमच्या गावात आणून गावात जमीन, हवा, जलस्रोतांचे, धूळ, ध्वनी प्रदूषण व्हायला नको. या प्रकल्पाची जागा वरच्या बाजूस आहे आणि गाव खाली असल्याने सर्व प्रदूषणाचा गावाला विळखा बसणार आहे. गावावर भविष्यात फार मोठे दुष्परिणाम होतील, अशी प्रतिक्रिया यावेळी जमलेल्या कुडचिरेवासीयांनी व्यक्त केली.

धक्काबुक्की, शाब्दिक चकमक

जमलेल्या लोकांनी सर्वप्रथम भूमापन बंद करण्याची मागणी केली. भूमापन प्रक्रिया बंद करा व नंतरच बोला, अशी भूमिका यावेळी ग्रामस्थांनी घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांना अडवून धरल्याने पोलीस व ग्रामस्थ यांच्यात बराच वेळ शाब्दिक चकमक झाली, तसेच लोकांना अडविताना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे काही काळ या भागातील वातावरण तणावाचे झाले होते. या तणावाच्या वातावरणात डिचोली पोलिसांनी काही लोकांना आंदोलनस्थळावरून बाजूला नेले. त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांना पुन्हा बाराजण येथे आणून सोडण्यात आले. तरीही लोकांनी भूमापन बंद पाडण्याची मागणी लावून धरली होती.

आमदारांचा मध्यस्थीचा प्रयत्न

या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हे बाराजण कुडचिरे येथे दाखल झाले. त्यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. लोकांनी भूमापन बंद करा व नंतरच बोला, असा आग्रह धरुन आक्रमक भूमिका घेतली. भूमापन सरकार करीत असून आपण ते बंद करू शकत नाही. आज केवळ जमिनीचे भूमापनच होणार आहे. ते त्यांना करू द्या, यापुढील प्रकल्प काय आहे त्यावर सरकारशी नंतर चर्चा करू, असे आमदार शेट यांनी लोकांना सूचविले.

या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांना पूर्ण माहिती मिळावी यासाठी कचरा व्यवस्थापन यंत्रणा, तसेच या प्रकल्पाचे अधिकारी यांची आम्ही बैठक बोलावणार असून हा प्रकल्प नेमका कसा असणार व त्यात कोणत्या प्रकारची प्रक्रिया होणार, याबाबत मार्गदर्शन ग्रामस्थांना केले जाणार आहे. लोकांचे हित जपूनच सरकार पावले उचलणार आहे. लोकांनी सरकारवर पूर्ण विश्वास ठेवावा. लोकांवर अन्याय करून आम्हाला अशा प्रकारचा प्रकल्प साकारायचा नाही, असे स्पष्टीकरण आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दिले.

 गावावर परिणाम न होण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

कुडचिरेत होऊ घातलेल्या या प्रकल्पासंदर्भात आपण पंचायत मंडळासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आजच सकाळी भेट घेतली. काही विषयांवर चर्चा केली. या कन्स्ट्रक्शन अँड डेब्रीट्स प्लांटमध्ये गोवाभरातील कचरा आणून टाकला जाणार नाही. या संदर्भात लेखी हमी देण्यासाठी आपण पंचायतीला लेखी पत्र देणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले आहे, आमदार शेट यांनी जमावाला सांगितले. ग्रामस्थांना हा प्रकल्प त्या जागेवर नको असल्यास ग्रामस्थांनी त्याच भागात इतर जागा द्यावी. प्रकल्पाबाबत सरकारला हरित लवादाची सूचना आहे. त्यामुळे सरकार या प्रकल्पासाठी आग्रही आहे. परंतु याचा कोणताही वाईट परिणाम गावावर होणार नाही, अशी हमी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली आहे, असेही शेट यांनी सांगितले.

 ओल्या कचऱ्याचा प्रकल्प नव्हे, गैरसमज नको

हा प्रकल्प साकारण्याचे काम सरकारने कचरा व्यवस्थापन यंत्रणेकडे दिल्याने तेथे कचऱ्याचा प्रकल्प येणार व त्याची दुर्गंधी व इतर बाबतीत गावाला त्रास होणार हा गैरसमज आहे. तो सर्वप्रथम दूर करावा. लोकांना आपण तेच सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु या प्रकल्पाबाबत लोकांची कोणीतरी दिशाभूल केलेली आहे. लोकांना कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, नुकसान होऊ नये, लीजधारकांवर अन्याय होऊ नये, यासाठी सरकार काळजी घेणार आहे. जर लोकांवर अन्याय होत असल्यास आपण आमदार या नात्याने सर्वात पुढे असणार, असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.