कोणा एकट्यामुळे सत्ता आलेली नाही!
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा टोला
बेळगाव : कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येण्यासाठी अनेक नेते, कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिले आहे. केवळ एकट्या-दुकट्यामुळेच सत्ता आली आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. ते आपण मान्य करणार नाही, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, अनेक नेते, आमदार, कार्यकर्ते आदींनी एकत्र येऊन काम केल्यामुळेच कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली आहे. असे असताना केवळ एका नेत्यामुळे सत्ता आली आहे, असे म्हटले तर ते आपल्याला मान्य नाही. असे सांगतानाच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची त्यांनी भलावण केली.
मुख्यमंत्री बदलासंबंधी व मंत्रिमंडळ पुनर्रचनेसंबंधी जोरदार चर्चा सुरू आहे. या शर्यतीत आता गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर हेही उतरले आहेत. आपणही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहोत, असे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपण आहोत. तशी आपली इच्छा आहे, या डॉ. जी. परमेश्वर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री होण्याची पात्रता त्यांच्यात आहे, असे जारकीहोळी यांनी सांगितले. यापूर्वी कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर येण्यासाठी त्यांचे प्रयत्न मोलाचे ठरले होते. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात काहीच चुकीचे नाही.
कारण, दलित, मागासवर्गीय व ओबीसी समुदायाचे लोकच काँग्रेसला नेहमी पाठिंबा देतात. त्यामुळे डॉ. जी. परमेश्वर यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यात गैर काय आहे? कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाचा निर्णय हायकमांडला घ्यायचा आहे. पण कोणा एका नेत्यामुळेच काँग्रेस सत्तेवर आली आहे, असे म्हणणे आपल्याला मान्य नाही. यासाठी अनेक नेत्यांचे श्रम, योगदान कारणीभूत ठरले आहे. याचा विसर पडू नये, असेही सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
कर्नाटकात नेतृत्वबदलासंबंधीच्या चर्चेने उचल खाल्ली आहे. डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जाऊन सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी वाढलेली असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या समर्थक नेते असणारे सतीश जारकीहोळी यांनी कोण्या एकामुळे काँग्रेस सत्तेवर आली आहे, असे म्हणता येणार नाही, असे सांगत डी. के. शिवकुमार यांच्यावर प्रतिहल्ला केला.