आण्विक युद्ध नको, रशिया-चीनचा सूर
जिनपिंग यांच्या शांतता प्रस्तावाला पुतीन यांचा पाठिंबा
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात अधिकृत द्विपक्षीय चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी आण्विक युद्ध कधीच होऊ नये असे मान्य केले आहे. या बैठकीत जिनपिंग आणि पुतीन यांनी एका महत्त्वाच्या घोषणापत्रावर स्वाक्षरी देखील केली आहे. या घोषणापत्रात आण्विक युद्धात कुणाचाच विजय होत नाही, आण्विक युद्ध कधीच केले जाऊ नये असे नमूद करण्यात आले आहे.
चीनच्या शांतता प्रस्तावाला युद्ध संपविण्याचा आधार म्हणून वापरले जाऊ शकते. पाश्चिमात्य देश आणि युक्रेनने तयारी दर्शविली तरच हे शक्य असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. चीनच्या 12 सूत्री शांतता प्रस्तावात रशियाच्या सैनिकांच्या युक्रेनमधून माघारीचा कुठलाच उल्लेख नाही. या प्रस्तावात केवळ चर्चा करणे आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाच आदर करण्याचा मुद्दा सामील आहे.
जिनपिंग यांनी चीन आणि रशियातील व्यापक तसेच सामरिक भागीदारी वाढविण्यासंबंधी पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रात रशिया-चीन सहकार्य दृढ करण्यावर चर्चा झाली आहे. याचबरोबर जिनपिंग आणि पुतीन यांनी 2030 पर्यंत चीन-रशिया आर्थिक सहकार्य योजनेच्या प्रमुख पैलूंशी निगडित एका द्विपक्षीय दस्तऐवजावर स्वाक्षरी केली आहे.
आम्ही मिळून बदल घडवू
100 वर्षांत घडला नाही असा बदल आता घडून येत आहे. आम्ही हा बदल एकत्रितपणे घडवून आणत आहोत असे उद्गार बैठकीनंतर जिनपिंग यांनी काढले आहेत. पुतीन यांनी यावर सहमती दर्शवत जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन केले.