For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाबोळीसाठी ‘भिवपाची गरज ना’!

01:08 PM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
दाबोळीसाठी ‘भिवपाची गरज ना’
Advertisement

विमानतळ चांगली कामगिरी करत असल्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा

Advertisement

पणजी : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दाबोळीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली असली तरी दाबोळीवर कोणताही परिणाम झालेला नाही. हा विमानतळ चांगली कामगिरी करत आहे, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ खुला झाल्यापासून असंख्य विमान कंपन्यांनी दाबोळीकडे पाठ फिरविली आहे. हे असेच चालू राहिल्यास एक दिवस दाबोळी हा ‘घोस्ट’ विमानतळ बनेल, अशी भीती लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विरोधी नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे सरकारने आक्रमक मार्केटिंग धोरण राबवावे, पार्किंग तसेच लँडिंग शुल्कात कपात करावी आणि इंधनावरील व्हॅटही कमी करावा, आदी मागण्या त्यांनी केल्या होत्या.

त्यावर पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत रोज भर पडत असून दोन्ही विमानतळांवर दिसणाऱ्या गर्दीवरून दोन्ही ठिकाणी चांगला व्यवसाय होत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगितले. त्याचा गोव्याच्या अर्थकारणावरही सकारात्मक प्रभाव दिसणार आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणी शिवाय दाबोळी सुरळीत चालेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील दहा वर्षांची विमान वाहतूक लक्षात घेऊन सरकारने दाबोळी विमानतळाचे विस्तारकाम नियोजित केले आहे. त्यासाठी नौदलाकडून अतिरिक्त सुमारे 8.3 एकर जमीन ताब्यात घेण्याचीही योजना आहे. या जमिनीत टर्मिनल इमारतीसह अन्य असंख्य साधनसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. हे सर्व पाहता दाबोळी घोस्ट विमानतळ बनेल याची भीती कुणीही बाळगू नये, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या विषयावर विजय सरदेसाई, नीलेश काब्राल, मायकल लोबो, दिगंबर कामत यांनीही विचार मांडताना कोणत्याही परिस्थितीत दाबोळी बंद पडू देऊ नका, अशी विनंती केली.

Advertisement

केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांची घेणार भेट : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त करताना लवकरच आपण केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची भेट घेऊन सदस्यांनी उपस्थित केलेली सर्व मते, शंका, सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवितो असे सांगितले. दाबोळी आता किंवा भविष्यातही बंद होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.