दीड दिवशीय गणरायाला भक्तिभावाने निरोप
पावसाने थोडी उसंत घेतल्याने आनंद : उत्सवाच्या पहिल्या टप्प्याची सांगता
पणजी : राज्यात शनिवारपासून प्रारंभ झालेल्या गणेशोत्सवात काल रविवारी दीड दिवशीय गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. विविध ठिकाणी सार्वजनिक गणपतीचेही पूजन करण्यात येत असले तरी दीड दिवसात विसर्जन होणारे श्रीगणेश हे घरगुतीच असतात. यंदा गणेशोत्सवावर पावसाचे सावट असले तरी लोकांचा उत्साह कायम आहे. शनिवारी प्रारंभ झालेल्या गणेशोत्सवामुळे सर्वत्र उमेदीचे वातावरण आहे. राज्यात पाच दिवसांपासून 21 दिवसांपर्यंत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. पैकी घरगुती गणेशोत्सव हा जास्तीत जास्त 11 दिवसांपर्यंतच असतो. अपवादात्मक स्थितीत एखाद्याच्या घरी 21 दिवसांपर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येतो. सार्वजनिक मंडळांचे गणेशोत्सव हे 7 ते 21 दिवसांपर्यंत आहेत.
काल रविवारी दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. कामधंद्यानिमित्त अन्यत्र स्थलांतरीत झालेले, स्थायिक झालेले लोक गणेशोत्सवानिमित्त आपापल्या घरी परततात. भक्तिभावाने गणेशपूजा करतात. आरती-भजनात रंगून जातात. त्यानंतर तेवढ्याच उत्साहात विसर्जन मिरवणुकीतही सहभागी होतात. यावर्षीही सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत काल थाटात विसर्जन करून गणरायाला निरोप देण्यात आला. काल दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आल्यानंतर आता बुधवारी पाच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यानंतर सात, नऊ, अकरा आणि नंतर एकवीस दिवसीय गणेशमूर्तीची भक्तिभावाने सेवा करून त्याला निरोप देण्यात येणार आहे.