पुन्हा ‘व्हाईटवॉश’ नको
क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की मंदगती गोलंदाजी कशी खेळावी याचा पायंडा आशियाई देशांकडून विशेषत: भारतीय संघाकडून घातला गेला होता. बचाव म्हटलं की राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा आठवतात. तर आक्रमण म्हटलं कि सेहवाग आठवतो. फार पूर्वी रिची बेनॉ, लान्स गिब्स यांची गोलंदाजी मला पाहता आली नव्हती. अर्थात त्यावेळी माझा जन्मही झाला नव्हता. परंतु त्यानंतर डेरेक अंडरवूड, शेन वॉर्न, मुरलीधरन यासारख्या दिग्गज मंडळींना गोलंदाजी करताना पाहता आलं. शेन वॉर्नला तर मला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर समालोचन कक्षातून याची देही याची डोळा अनुभवता आलं. ही सर्व मंडळी त्या त्या काळातील ‘मैलाचा दगड’ प्राप्त करणारे खेळाडू होते. परंतु यांची डाळ भारतात कधीच शिजली नाही. आणि जर क्वचित शिजलीच तर ती चविष्ट नसायची. काही परदेशी मंदगती गोलंदाजांची कारकीर्द भारतातच संपायची. काही वर्षांपूर्वी शेन वॉर्नला तर सचिनने दिवसाढवळ्या तारे दाखवले होते. परंतु मागील काही वर्षात क्रिकेट 360 डिग्रीत फिरलं. कोणीही यावं आणि टपली मारावी, त्याप्रमाणे परदेशी मंदगती गोलंदाजांनी आपल्या फलंदाजांचं दिवाळं काढलं. नॅथन लायन, मोईन अली, आणि काल-परवाचा सँटनर यांनी तर मुंबईच्या भाषेत भारतीय फलंदाजांना ‘गिऱ्हाईक’ बनवलंय. वरील गोलंदाजांना झटपट डाव त्यांच्या स्वाधीन करणे म्हणजे वांग्याची भाजी खाऊन मटण खाल्ल्याचा आव आणण्यासारखं होतं. थोडक्यात काय तर मागील काही वर्षात परदेशी मंदगती गोलंदाज भारतात आले की भारतीय फलंदाज ‘ढुंडो ढुंडो रे साजना’ हे गीत आळवू लागतात. मागच्या दिवाळीत तर किवीनी आपल्याच मायभूमीत येऊन फटाके वाजवले. यावर्षी दिवाळीनंतर काही दिवसातच आफ्रिकेने त्या दिवाळीची आठवण करून दिली.
भारतात कसोटी सामना म्हटला की आखाडा तयार करायचा आणि पाहुण्यांना लज्जीत करायचं ही परंपरा पुर्वापार चालत आली आहे. परंतु हाच आखाडा भारताला सध्या घातक ठरू पाहतोय. मागील चार-पाच वर्षात कुठल्याही देशाचे स्पिनर्स असू देत, भारतीय फलंदाजांना त्यांच्यासमोर खेळणं आव्हानात्मक झालं आहे. बरं, या आखाड्यात तुम्हाला तुमची नय्या पार करणारे ना राहुल द्रविड आहेत ना चेतेश्वर पुजारा. ना पूर्वीचा मंदगती गोलंदाजांना खेळणारा बाप खेळाडू मोहम्मद अझरुद्दीन. तुम्ही आयपीएल नामक खेळाडूंवर कसोटीची नय्या पार करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते महाकठीणच. हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे आज आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना रंगतोय. रंगतोय म्हणणं थोडसं धाडसाचं होईल. परंतु सामना रंगेल एवढी अपेक्षा आपण निश्चित करू शकतो. गुवाहाटीच्या या मैदानावर प्रथमच कसोटी सामना खेळला जातोय. (राजकारणात गुवाहाटाला किती महत्त्व आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.) या मैदानावर दोन खेळपट्ट्या आहेत, एक काळी माती धारण केलेली तर दुसरी लाल माती धारण केलेली. यापैकी कुठल्या खेळपट्टीवर हा सामना होतोय आणि ती खेळपट्टी काय रंग दाखवते, हे बघणं कमालीचे रंजक ठरणार आहे. आखाडे बनवून आपण काय साध्य केलंय हे आपण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत बघितलंच होतं. कधी नव्हे तो मायदेशात बऱ्याच वर्षांनी व्हाईटवॉश बघायला मिळाला. माझ्यामते कसोटी सामने हे पाच दिवस रंगले पाहिजेत, त्याच अनुषंगाने खेळपट्ट्या बनल्या पाहिजेत. क्रिकेटच्या पंढरीत काही दिवसांपूर्वी पाच कसोटींची मालिका पाचही दिवस रंगली. परंतु भारतात कसोटी सामना तीन दिवसीय सराव सामन्यासारखा संपतो. ही मात्र क्रिकेटसाठी काही चांगली लक्षणं नाही आहेत.
कसोटी क्रिकेट म्हटलं की कित्येक तास खेळपट्टीवर टिकून राहणं महत्त्वाचं असतं. मागच्या सामन्यात के. एल. राहुल वगळता बाकीचे खेळाडू मस्टरवर सही करण्यापुरतेच खेळपट्टीवर आले होते. त्यातच काही खेळाडूंनी सीएल, पीएल रजा मंजूर करून घेण्यात धन्यता मानली. आता पुन्हा तेच चित्र या सामन्यात बघायला मिळालं तर मात्र कित्येक क्रिकेट रसिकांचा आयपीएलच्या या झटपट क्रिकेटच्या जमान्यात खऱ्याखुऱ्या क्रिकेटवरचा विश्वास उडून जाईल.
मागील काही सामन्यातील भारतातील कसोटी क्रिकेट बघून भारतीय फलंदाज तंत्रशुद्ध खेळणं विसरलेत की काय, हा प्रश्न मनाला चाटून जातो. मंदगती गोलंदाजांविरुद्ध पदलालित्य (फुटवर्क) आजकाल औषधालाही बघायला मिळत नाही. असो. सध्या टेंबा बवुमाचा आफ्रिकन संघ कमालीचा फॉर्मात आहे. त्यातच कर्णधार विजयाच्या बाबतीत अपराजित आहे. मागील सामन्यातील त्याचे अर्धशतक हे द्विशतकासमान होतं. क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळी एखाद्या संघाची किंवा एखाद्या खेळाडूची विजयाची माळ अपराजित राहते, त्या त्या वेळी भारतीय संघानेच दे धक्का म्हणत त्यांना निराश केलं आहे. काही वर्षांपूर्वी स्टीव वॉचा ऑस्ट्रेलियन संघ तर काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा महिला संघ त्याला साक्ष आहे. आता त्याच ओळीमध्ये टेंबा बवुमा आहे. असो.
आता आपल्याला कसोटी क्रिकेटमध्ये व्हाईटवॉश परवडण्यासारखा नाही. अगदी दुसऱ्याच भाषेत सांगायचं तर नाय! नो! नेव्हर!. त्यामुळे या महत्वपूर्ण सामन्यात भारतीय संघ कडवी लढत देत थोड्या फार प्रमाणात लाज राखेल हीच अपेक्षा.