यापुढे कर्णधारांवर स्लो ओव्हररेट बंदीची कारवाई नाही : बीसीसीआय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयपीएलमध्ये यापुढे षटकांची गती न राखल्याबद्दल कर्णधारावर बंदीची कारवाई होणार नाही. त्याऐवजी त्याच्यावर डिमेरिट गुण लावले जाणार आहेत.
गुरुवारी झालेल्या आयपीएल कर्णधारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या व दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत यांच्यावर याच गुन्ह्याबद्दल एक सामन्याची बंदी असल्यामुळे या मोसमातील पहिल्या सामन्यात ते खेळू शकणार नाहीत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे. 2024 च्या आवृत्तीत तीन वेळा त्यांच्याकडून स्लो ओव्हररेट गुन्हा झाल्यानंतर त्यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. हार्दिक आता चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध होणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या सामन्यात खेळू शकणार नाही.
‘लेव्हल 1 गुन्ह्यात आता 25 ते 75 टक्के सामना मानधन कपातीस डिमेरिट गुण दिले जातील. पुढील तीन वर्षासाठी हे गुण नोंदले जातील. लेव्हल 2 गुन्हा घडल्यास 4 डिमेरिट गुण दिले जातील. जमा झालेले एकूण डिमेरिट गुणांच्या आधारे सामनाधिकारी दंडात्मक कारवाई करू शकतात. त्यांच्यावर 100 टक्के सामना मानधन कपातीचा दंड किंवा जादा डिमेरिट गुण जमा केले जातील. या डिमेरिट गुणांमुळे त्याच्यावर सामना बंदीची कारवाई होऊ शकते. मात्र स्लो ओव्हररेटमुळे यापुढे कर्णधारावर सामनाबंदीची कारवाई होणार नाही,’ असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.