यापुढे दहावी विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क नाही!
शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
दहावी विद्यार्थ्यांना गत शैक्षणिक वर्षात ग्रेस मार्क देण्यात आले होते. मात्र, पुढील वर्षापासून ग्रेस मार्क देणार नसल्याचे शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री मधू बंगारप्पा यांनी सांगितले आहे. त्यामुळे यंदा दहावीत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हा नियम लागू असणार आहे. मागील शैक्षणिक वर्षात दहावी परीक्षा निकालात घसरण झाली होती. राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊन सुद्धा निकाल कमी लागला होता. चर्चा न करता शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. शिक्षणतज्ञांसह अनेकांना ग्रेसमार्क पद्धतीला आक्षेप घेतला होता. त्यामुळे पुढील दहावी विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देणार नसल्याचे शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी स्पष्ट केले आहे.
बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना मधू बंगारप्पा म्हणाले, पुढील वर्षापासून दहावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क असणार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितले. मागील वेळेस शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना 20 टक्के ग्रेस मार्क दिले होते. त्यामुळे अनुत्तीर्ण होण्याच्या टप्प्यात असलेले अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तरी सुद्धा 2023-24 या वर्षात दहावीचा निकाल 73.40 टक्के लागला होता. 2022-23 मध्ये हा निकाल 83 टक्के होता. मागील वर्षी 1.70 लाख विद्यार्थ्यांना 20 टक्के ग्रेस मार्क देण्यात आले होते. परंतु, यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावण्याची भीती शिक्षणतज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे पुढील वेळेस ग्रेस मार्क न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.