स्थलांतर नको, सुविधा पुरवण्याची मागणी
भीमगड अभयारण्यातील ग्रामस्थांचे निवेदन
खानापूर : भीमगड अभयारण्य परिसरात वसलेल्या गावांना सुविधा पुरवा आणि आम्हाला मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्यासाठी सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, ही गावे हजारो वर्षांपूर्वी वसलेली आहेत. त्यामुळे आमच्या परंपरा संस्कृतीशी नाळ जोडलेली आहे. स्थलांतर करून आमची संस्कृती आणि परंपरा मिटविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आम्हाला स्थलांतर नको, मूलभूत सुविधा पुरवा, अशा मागणीचे निवेदन शिरोली ग्राम पंचायत आणि नेरसा ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील भीमगड अभयारण्यात वसलेल्या हेम्माडगा, जामगाव, कृष्णापूर, कोंगळा, देगाव यासह इतर गावातील नागरिकांनी नुकताच हेम्माडगा येथे स्थलांतराना धनादेश वितरणप्रसंगी वनमंत्री ईश्वर खांड्रे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी भीमगड अभयारण्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेरसा, शिरोली ग्राम पंचायत क्षेत्रातील अनेक गावे ही भीमगड अभयारण्यात वसलेली आहेत. भीमगड अभयारण्य जाहीर झाल्यापासून या संपूर्ण भागातील विकासकामाबाबत वनखात्याकडून आडमुठे धोरण राबविण्यात येत असून या गावांना साधा रस्ता, वीज, पाणी यासह कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत वनखात्याकडून कायम अडथळा आणण्यात येत आहे. यामुळे या भागातील नागरिकांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. ही गावे हजारो वर्षांपासून या ठिकाणी वसलेली आहेत. त्यामुळे या गावांना शासनाने सर्व सुविधा पुरवाव्यात, आम्हाला स्थलांतर अजिबात नको आहे. आम्हाला आमची संस्कृती, परंपरा आणि निसर्ग टिकवायचा आहे. यासाठी शासनाने स्थलांतराचा विचार बाजूला सारून आम्हाला मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि वनमंत्री ईश्वर खांड्रे यांना देण्यात आले. यावेळी भीमगड अभयारण्य परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.