आता ‘ब्रेनड्रेन’ नाही, तर ‘ब्रेनगेन’
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचा निर्धार आहे. या निर्धाराला अनुकूल अशा अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. या योजनांपैकी एक असणारी ‘वैभव’ ही योजना नुकतीच लागू करण्यात आली असून तिच्या अंतर्गत भारताबाहेर काम करीत असणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना भारतात येऊन संशोधक करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत 75 अव्वल शास्त्रज्ञांनी आवेदनपत्रे सादर केली आहेत.
ही योजना केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने आणली आहे. तिच्यासाठी पहिल्या टप्प्यात 80 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या रकमेतून या शास्त्रज्ञांना मानधन आणि शिष्यवृत्ती मिळणार आहे. देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधनाला वाहून घेतलेल्या विविध संस्थांमध्ये हे शास्त्रज्ञ काम करणार आहेत. अशा संशोधकांची पहिली तुकडी येत्या एप्रिलपासूनच भारतात येणार असून संशोधनाला प्रारंभ करणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
योजनेचे हेतू
भारताला उपयुक्त असणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्या आहे. तंत्रज्ञान विकास झाल्याशिवाय भारतात रोजगारनिर्मितीही होणार नाही. तसेच निर्यात करण्यायोग्य उत्पादने भारतात मोठ्या प्रमाणात निर्माण करणे हा सुद्धा या योजनेचा हेतू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ही योजना लागू करण्यात आली असून, ती यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.
योजनेचे स्वरुप
या योजनेअंतर्गत विदेशात उच्च पदांवर काम करणारे भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक भारतात येऊन संशोधन करतील. ते आळीपाळीने प्रत्येकी वर्षाकाठी दोन महिने भारतात येऊन संशोधक आणि विकास प्रकल्पांवर संशोधन करतील. एक संशोधक साधारणत: तीन वर्षांसाठी अशाप्रकारे कार्यरत राहील. संशोधकांना 4 लाख रुपये अनुदान दिले जाईल. जे संशोधक भारतात स्थायी स्वरुपात काम करीत आहेत, त्यांच्या या विदेशात काम करणाऱ्या संशोधकांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
संशोधक कोणत्या क्षेत्रांमध्ये
हे संशोधक विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांमध्ये संशोधन करतील. तथापि, हे संशोधन मुख्यत्वेकरुन कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण यात केले जाईल. माहिती तंत्रज्ञान हे नव्या युगाचे कळीचे तंत्रज्ञान आहे. ते आत्मसात करावेच लागणार आहे. यापुढच्या काळात केवळ माहिती तंत्रज्ञानावर विसंबून राहता येणार नाही. या तंत्रज्ञानाला कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागणार आहे. भारतात या तंत्रज्ञानाचा विकास वेगाने होऊ शकतो. त्यामुळे त्यावर भर दिला जाणार आहे, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्पष्ट केले आहे.
संशोधकांनाही मोठी संधी
विदेशात काम करणाऱ्या भारतीय संशोधकांना भारताच्या विकासाला हातभार लावण्याची संधी या योजनेमुळे मिळणार आहे. त्यांच्यापैकी अनेकांच्या मनात आपल्या मूळ देशासाठी भरीव कामगिरी करण्याची इच्छा असते. ती त्यांची सुप्त इच्छा या योजनेमुळे प्रत्यक्षात उतरणार आहे. अनेकजण यासाठी उत्सुक आहेत. प्रथम आवाहनातच 302 संशोधकांनी आवेदनपत्रे सादर केली होती. त्यांच्यापैकी 22 आवेदनपत्रे स्विकारण्यात आली आहेत. किमान एक सहस्त्र संशोधक भारतात येऊन काम करण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. हा प्रतिसाद अपेक्षेपेक्षाही अधिक आहे, अशी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची भावना आहे. या योजनेचे परिणाम सकारात्मक दिसून आल्यास भविष्यकाळात तिचा विस्तार केला जाईल.
सर्वाधिक आवेदने अमेरिकेतून
जे शास्त्रज्ञ भारतात येऊन काम करण्यास उत्सुक आहेत. त्यांच्यात अमेरिका आणि कॅनडातील संशोधकांची संख्या सर्वात मोठी आहे. या दोन्ही देशांमध्ये भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांची संख्या मोठी असून त्यांच्यापैकी अनेकजण ज्येष्ठ पदांवर आहेत. त्यांचे ज्ञान आणि अनुभव यांचा लाभ भारताला करुन देण्यासाठी ही योजना साकारण्यात आली आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
आधुनिक तंत्रज्ञान विकासाचे महत्व
ड सध्याचे जग नुसते ज्ञानाधारित नाही, तर तंत्रज्ञानाधारित आहे. ज्या देशांनी प्रयत्नपूर्वक आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे, त्यांचेच व्यवहारिकदृष्ट्या जगावर राज्य आहे. तंत्रज्ञानविकासात मागे पडलेल्या देशांना अशा पुढारलेल्या देशांवर अवलंबून रहावे लागते. संरक्षण, कृषी आणि उद्योग या महत्वाच्या तीन क्षेत्रांमधील प्रगतीवरच कोणत्याही देशाचे पुढारलेपण किंवा प्रगती अवलंबून असते.
ड पुरातनकाळी भारत त्यावेळच्या जगाच्या तुलनेत एक विकसित राष्ट्र होता, ही बाब आता पाश्चिमात्य विद्वानही मान्य करतात. भारतात मानवी कौशल्यावर आधारित असणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले होते. ते आताच्या यंत्रविज्ञानापेक्षा किंवा संगणकीय तंत्रज्ञानापेक्षा वेगळे होते. पण त्यावेळच्या तंत्रज्ञानाच्या आधारावर भारत जगात व्यापारात एक अग्रभागी असणारा देश होता. असे म्हटले जाते, की त्यावेळी भारत आणि चीन या दोन देशांचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न त्यावेळच्या जगाच्या 60 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात होते.
ड यावरुन हे सिद्ध होते की तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात कोणत्याही काळात आपण अग्रेसर असणे आवश्यक आहेत प्रत्येक काळातील समाजाच्या आवश्यकता भिन्न भिन्न असतात. त्यानुसार तंत्रज्ञान विकास केला जातो. तंत्रज्ञान विकास जसजसा होत जातो तशा समाजाच्या आवश्यकताही त्यानुसार परावर्तीत होत जातात. अशाप्रकारे या दोन्ही बाबी एकमेकांवर अवलंबून आहेत.
ड जे देश ज्या काळात त्यावेळच्या परिस्थिती नुसार तंत्रज्ञानात आघाडीवर होते, त्यांनी त्यावेळच्या जगावर आपला आर्थिक, सामरिक आणि औद्योगिक प्रभाव पाडला होता. मध्ययुगात भारतावर परकीय आक्रमणे झाल्याने त्यानंतरच्या काळात कौशल्याधारित तंत्रज्ञान विकास हळूहळू लोप पावला आणि भारत अधिकाधिक दुबळा होत चालला, हेही आता ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध झाले आहे.
ड परिणामी, आधुनिक काळात ही स्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल तर भारताला तंत्रज्ञान विकासासाठी शक्य तितके सर्व प्रयत्न करणे अनिवार्य आहे. भारतात आज असणाऱ्या बेरोजगारी आणि भूक या समस्या तंत्रज्ञान विकासात पाठीमागे पडल्याने निर्माण झाल्या आहेत. नवे तंत्रज्ञान नवे रोजगार निर्माण करते. त्या तंत्रज्ञानाच्या आधारावर निर्माण केलेल्या वस्तूंची निर्यात करुन देश पैसा मिळवू शकतो. अशाप्रकारे तंत्रज्ञान विकास संपत्ती निर्माणासाठी आवश्यक आहे.
ब्रेनड्रेन म्हणजे काय आणि ते का होते
ड भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र मिळाल्यानंतर कला, भाषा, संस्कृती, मनोरंजन, आहार, विहार आदी क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाल्याचे दिसून येते. तथापि, तंत्रज्ञान विकासाकडे, त्याचे महत्व ज्ञात असूनही विशेष लक्ष देण्यात आले नाही. स्वत:च्या देशात नवनव्या वस्तू निर्माण करण्याऐवजी जगातून त्या विकत घेऊन आपली आवश्यकता भागविण्याचे धोरण अवलंबिण्यात आले. याचा परिणाम म्हणून संरक्षणासह बहुतेक सर्व क्षेत्रात स्वतंत्र भारतही परावलंबीच राहिला.
ड भारतीय नागरिकांमध्ये शिक्षण घेणे आणि तंत्रज्ञान विकासासाठी प्रतिभा मोठ्या प्रमाणात आहे. तथापि, या अंगीभूत प्रतिभेला धोरणाचा पाठिंबा न मिळाल्याने भारतातील हे टॅलेंट विदेशात जाऊ लागले. अमेरिका आणि युरोपमध्ये तंत्रज्ञान विकासाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले गेल्याने भारताचे तंत्रज्ञ आणि वैज्ञानिक तेथे स्थायिक होऊन त्या देशाच्या संपत्तीत भर घालू लागले. आजही ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यालाच ब्रेनड्रेन किंवा प्रतिमागमन असे म्हणतात.
ड आजही भारतातील आयआयटीसारख्या उच्चशिक्षण संस्थांमध्ये शिकलेले विद्यार्थी अमेरिका किंवा युरोप येथे काम करण्याकडे प्रचंड कल दाखवितात. याचे कारण त्या देशांमध्ये केवळ पैसा जास्त मिळतो हे नाही. तर तेथे त्यांच्या अंगभूत ‘टॅलेंट’ला न्याय मिळतो. त्यांच्या गुणवत्तेची चुणूक दाखविण्याची संधी त्यांना उपलब्ध होते. म्हणून तेथे जाण्याचे प्रमाण मोठे आहे. आज अनेक भारतीय वंशाचे प्रतिभावंत तंत्रज्ञ अमेरिकादी देशांमध्ये मोठ्या आणि सन्मानाच्या पदांवर आहेत. माहिती तंत्रज्ञान, संगणक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये हे भारतीय वंशाचे लोक उच्च स्थानांवर आहेत. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेचा लाभ त्या देशांना होतो आणि भारत त्यापासून वंचित राहतो.
योजना काय करणार आहे?
ड या योजनेच्या अंतर्गत विदेशस्थ भारतीयांना त्यांच्या तंत्रज्ञान प्रतिभेचा उपयोग भारतासाठी करण्याची संधी मिळणार आहे. असे भारतीय प्रतिभावंत त्यांचे विदेशातील स्थायिकत्व राखून भारताला तंत्रज्ञान विकासात साहाय्य करु शकणार आहेत. त्यामुळे या योजनेला प्रारंभापासूनच उत्साहवर्धक प्रतिसाद आहे.
ड विदेशात काम करणाऱ्या भारतीय तंत्रज्ञांना विदेशातील अत्युच्च आणि प्रगत तांत्रिक ज्ञानाचा परिचय असतो. त्याचा लाभ ते नियमांच्या चौकटीत राहूनही भारताला करुन देऊ शकतात. भारतात जे संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, त्यांच्यात ते मोलाची भर टाकू शकतात. हे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी साहाय्य करु शकतात. त्यामुळे भारतातही मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानविकास होऊन भारताची आर्थिक प्रगती गतीमान करण्यासाठी ते कारणीभूत ठरु शकतात.
ड ही योजना भारताच्या प्रगतीसाठी हातभार लावू इच्छिणाऱ्या अशा प्रतिभावंत तंत्रज्ञांसाठी एक संधी आणि माध्यम म्हणून कार्य करु शकते. योजनेचे क्रियान्वयन सुयोग्य रितीने आणि सातत्यपूर्ण पद्धतीने केल्यास तिचा निश्चितच लाभ होऊ शकतो. भविष्यकाळात ही योजना अधिक व्यापक केली जाऊ शकते. भारतातच तांत्रिक प्रतिभेला संधी मिळाल्यास दीर्घकालीन परिणाम म्हणून ब्रेनड्रेन कमी होऊ शकते, असे मत केंद्र सरकारने, तसेच अनेक तज्ञांनीही व्यक्त केले आहे.
अभिनव योजना
ड भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासाला गती देण्यासाठी योजना
ड कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि यंत्रविज्ञानावर अधिक भर असणार
ड विदेशातील शास्त्रज्ञ आणि संशोधक देशी संस्थांमध्ये कार्यरत राहणार
ड विदेशातून भारतात येऊन काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना मानधन देणार
अजित दात्ये