या ठिकाणी लागू होत नाही कुठलाही कायदा
कर देखील भरत नाहीत लोक
स्लॅब सिटी एक अशी जागा आहे, जेथे राहण्यासाठी कुठल्याही प्रकारचे भाडे भरावे लागत नाही. तसेच तेथे कुठलाही कर भरावा लागत नाही आणि येथे कुठलेही नियम-कायदा लागू होत नाही. या ठिकाणाला पृथ्वीवरील ‘लॉ लेस प्लेस’ देखील म्हटले जाते. येथे लोक स्वतःच्या मर्जीने जीवन जगतात. परंतु येथे राहणे अत्यंत आव्हानात्मक असल्याचा दावा एका टीव्ही चॅनेलचे सूत्रसंचालक बेन फोगले यांनी स्वतःच्या कार्यक्रमात केला आहे. फोगले यांनी अलिकडेच स्वतः स्लॅब सिटीत जात तेथील स्थिती जाणून घेतली आहे.
स्लॅब सिटी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील एक जागा असून तेथे बंदूक आणि अमली पदार्थांचा बोलबाला आहे. या ठिकाणी मानसिक समस्यांनी पीडित लोक जातात किंवा कायद्यापासून वाचण्यासाठी लोक येथे पोहोचतात. या वाळवंटी भागात कुठलेच सरकार/प्रशासन नाही. बेघर किंवा समाजापासून वेगळे पडलेल्या लोकांचे हे घर ठरले आहे.
वाळवंटी भागात निर्माण स्लॅब सिटीमध्ये पाणी, गॅस तसेच विजेची व्यवस्था नाही. दुसऱया महायुद्धाच्या काळात अमेरिकेच्या सैनिकांच्या प्रशिक्षणासाठी याची निर्मिती करण्यात आली होती. 1956 मध्ये येथील इमारती तोडण्यात आल्या होत्या. हे शहर उदध्वस्त काँक्रिटचे ठिकाण ठरले होते. परंतु हळूहळू फिरत राहणारे लोक आणि माजी सैनिकांचे हे ठिकाण झाले.
सर्वसाधारणपणे येथे येणारे लोक सामाजिक स्वरुपात एकाकी पडलेले असतात. जगात काय घडतंय हे येथे राहणाऱया लोकांना माहित नसते. येथील अडचणींमधून लोक बरेच काही शिकू शकतात असे फोगले यांचे म्हणणे आहे.