अमेरिकेत ‘नो-किंग’ आंदोलन
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आवाज बुलंद : विविध ठिकाणी जोरदार निदर्शने
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध शनिवारी अमेरिकेत सर्वात मोठे निदर्शने झाली. देशभरातील विविध शहरांमध्ये 2,600 हून अधिक रॅली काढण्यात आल्या, ज्यात अंदाजे 70 लाख लोक सहभागी झाले होते. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये शनिवारी लाखो लोक एकाचवेळी रस्त्यावर उतरले. ‘नो किंग्ज प्रोटेस्ट’ या बॅनरखाली झालेल्या या निदर्शनांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्धचे सर्वात मोठे राष्ट्रीय आंदोलन मानले जात आहे. ‘नो किंग्ज प्रोटेस्ट’ हा आता केवळ ट्रम्प यांच्या विरोधातला निषेध राहिलेला नाही, तर तो अमेरिकेत लोकशाही विरुद्ध हुकूमशाही या नवीन चर्चेचे प्रतीक बनल्याचे दिसत आहे.
अमेरिकेतील माध्यमांच्या वृत्तानुसार, सर्व 50 राज्यांमध्ये 2,600 हून अधिक निदर्शन-रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, अटलांटा आणि शिकागो सारख्या प्रमुख शहरांपासून ते लहान शहरांपर्यंत मोठ्या बऱ्याच ठिकाणी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. ही निदर्शने हुकूमशाहीच्या विरोधात आणि लोकशाहीच्या समर्थनार्थ सुरू करण्यात आली होती. या आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाही संस्थांना कमकुवत करणे, इमिग्रेशन धोरणे कडक करणे, आयसीई छापे टाकणे आणि संघीय सैन्य तैनात करणे यासाठी ट्रम्प प्रशासनावर निदर्शकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ट्रम्प यांच्या राजवटीत देश वेगाने हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याचा निदर्शकांचा आरोप आहे. यापूर्वी जूनमध्ये झालेल्या पहिल्या ‘नो किंग्ज’ निदर्शनादरम्यान अंदाजे 2,100 निदर्शन-रॅली काढण्यात आल्या होत्या. विरोधी पक्षनेत्यांचा निदर्शनांना पाठिंबा असल्याचे मानले जात आहे.
‘नो किंग्ज’ निदर्शनादरम्यान न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर, बोस्टन, अटलांटा आणि शिकागोमधील उद्यानांमध्ये मोठा जमाव जमला होता. वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस आणि अनेक रिपब्लिकन शासित राज्यांमध्येही लोक रस्त्यावर उतरले. रिपब्लिकन पक्षाने या निदर्शनांना ‘हेट अमेरिका रॅलीज’ असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी ‘नो किंग्ज’ निदर्शनांना एआय-जनरेट केलेल्या व्हिडिओद्वारे प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्या ट्रुथआउट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 20 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला असून त्यात ते मुकुट परिधान केलेल्या लढाऊ जेट पायलटच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्या जेटवर ‘किंग ट्रम्प’ असे लिहिलेले होते.
ट्रम्प यांच्या कार्यकाळातील तिसरे मोठे आंदोलन
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकाळातील हे तिसरे मोठे आंदोलन आहे. महत्त्वाचे म्हणजे, अमेरिका सध्या बंद आहे, अनेक सरकारी सेवा ठप्प आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या कठोर धोरणामुळे काँग्रेस आणि न्यायपालिकेशी संघर्ष वाढत आहे. याचदरम्यान निदर्शनातील सहभागींनी लोकशाही, न्याय आणि सत्तेच्या गैरवापराविरुद्ध आवाज उठवला. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये निदर्शकांनी शांततेत निदर्शने केली. शहरात एक लाखाहून अधिक लोक सहभागी झाले असले तरी पोलिसांनी अटक केलेली नाही असे वृत्त आहे. बोस्टन, फिलाडेल्फिया, अटलांटा, डेन्व्हर, शिकागो आणि सिएटलमध्येही हजारो लोक जमले होते.