For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतातील निवडणुकीत हस्तक्षेप नाही : अमेरिका

06:22 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतातील निवडणुकीत हस्तक्षेप नाही   अमेरिका
Advertisement

रशियाच्या आरोपानंतर दिले स्पष्टीकरण : भारताची जनताच ठरविणार निकाल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतासोबतचे सहकार्य वाढविणे हे आमचे काम आहे. भारतातील निवडणुकीत अमेरिकेकडून कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसल्याचा दावा अमेरिकेचे राजदूत गार्सेटी यांनी म्हटले आहे. अमेरिकन थिंक टँक कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सकडून आयोजित एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान कथित मानवाधिकार उल्लंघनाशी निगडित अहवालांवर प्रश्न विचारण्यात आला होता. हा भारताचा अंतर्गत विषय आहे. अनेक देश परस्परांशी संबंध कायम राखण्यासाठी अशा मुद्द्यांवर बोलणे टाळतात, परंतु अमेरिका असे करत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Advertisement

आम्ही नेहमीच भारतासोबत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करतो, मग तो मानवाधिकार अहवाल असो किंवा धार्मिक स्वातंत्र्याशी निगडित एखादे प्रकरण अमेरिकेच्या राजदूताने नमूद केले आहे. याचबरोबर अमेरिकेने भारतातील लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप करण्याच्या रशियाच्या आरोपांना फेटाळले आहे. आम्ही भारतीय निवडणुकीत हस्तक्षेप करत नाही, निवडणुकीचा निकाल तेथील जनताच ठरविणार असल्याचे अमेरिकेच्या विदेश विभागाने म्हटले आहे.

भारताच्या कारवाईने संतुष्ट

भारतातील निवडणुकीत अमेरिका अडथळे निर्माण करतोय. गुरपतवंत सिंह पन्नू प्रकरणी देखील अमेरिकेने भारतावर निराधार आरोप केले आहेत असा दावा रशियाने बुधवारी केला होता. याप्रकरणी अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांना प्रश्न विचारण्यात आला. भारत किंवा अन्य कुठल्याही देशाच्या निवडणुकीत अमेरिका हस्तक्षेप करत नाही.  पन्नूप्रकरणी सर्व आरोप जाहीरपणे उपलब्ध आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही कुठलीच टिप्पणी करू इच्छित नसल्याचे मिलर यांनी प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे. दुसरीकडे पन्नूप्रकरणी भारताने आतापर्यंत केलेली कारवाई पाहता अमेरिका समाधानी आहे. याप्रकरणी तपासासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. अमेरिकेच्या भूमीवर आमच्या नागरिकाला ठार करण्याचा प्रयत्न कुणी केला तर तो लक्ष्मणरेषा ओलांडण्याचा प्रकार असल्याचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.