For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झारखंडमध्ये प्राप्तिकरचे छापासत्र

06:58 AM Nov 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
झारखंडमध्ये प्राप्तिकरचे छापासत्र
Advertisement

रांची-जमशेदपूरमधील 17 ठिकाणांवर धाडी : हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय रडारवर

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे स्वीय सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी शनिवारी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रांचीच्या अशोक नगर रोड नंबर 4 समोर सुनील श्रीवास्तव यांच्या निवासावर प्राप्तिकर विभागाकडून दिवसभर तपासकार्य सुरू होते.

Advertisement

प्राप्तिकर विभागाच्या पथकाने रांची आणि जमशेदपूरमध्ये जवळपास 17 ठिकाणांवर छापे टाकल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत कोणता मुद्देमाल व दस्तावेज हस्तगत करण्यात आला याविषयी सविस्तर माहिती जारी करण्यात आली नाही. तथापि, एकाचवेळी अनेक ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रामुळे अधिकारी आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

प्राप्तिकर विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव सीआरपीएफचे जवानही छापा टाकण्याच्या ठिकाणी तैनात केले होते. या छाप्यांचा संबंध विधानसभा निवडणुकीशी जोडला जात आहे. खरे तर, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, अशा भारतीय निवडणूक आयोगाच्या कडक सूचना आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीवर कोणत्याही प्रकारे प्रभाव टाकण्यासाठी पैशाच्या बळाचा वापर होत असल्याच्या संशयाने ही कारवाई हाती घेण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी आयटीचे छापे हे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी उचललेले पाऊल ठरू शकते, असे मानले जात आहे.

मुख्यमंत्र्यांचा स्वीय साहाय्यक लक्ष्य

प्राप्तिकर विभागाच्या पथकाने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा स्वीय साहाय्यक सुनील श्रीवास्तव याला प्रामुख्याने लक्ष्य बनवले होते. श्रीवास्तव यांच्या रांची येथील अशोकनगर येथील निवासस्थानावर तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या निवासस्थानावर कडक सुरक्षा व्यवस्था असताना छापे टाकण्यास सुऊवात केली. तसेच प्राप्तिकर विभागाच्या पथकाने सकाळपासून जमशेदपूरमधील व्यापारी आणि औद्योगिक प्रतिष्ठानांवर एकाच वेळी शोधमोहीम सुरू केली.

सुनील श्रीवास्तव हे झामुमोचे स्टार प्रचारकही

सुनील श्रीवास्तव हे दीर्घकाळ मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे स्वीय सचिव होते. ते आधी सरकारी विभागात अभियंता होते. नंतर त्यांनी नोकरी सोडली आणि हेमंत सोरेन यांचे सहकारी म्हणून काम करू लागले. ते झारखंड मुक्ती मोर्चाच्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि पक्षाचे स्टार प्रचारक देखील आहेत.

यापूर्वीही छापेमारी

याआधी, विधानसभा निवडणुकीत हवालाच्या मदतीने पैशांच्या व्यवहाराच्या माहितीवरून प्राप्तिकर विभागाने 26 ऑक्टोबरला रांची, जमशेदपूर, गिरिदीह आणि कोलकाता येथील 35 व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापनांवर दोन दिवस छापे टाकले होते. या कारवाईत व्यावसायिकांची 150 कोटी ऊपयांची बेनामी मालमत्ता आणि गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. प्राप्तिकर विभागाने छापेमारीत सापडलेली रोकड व्यापाऱ्यांच्या खात्यांच्या पुस्तकांशी जुळवून पाहिल्यानंतर बरीच रक्कम बेहिशेबी असल्याचे आढळून आले होते.

Advertisement
Tags :

.