For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्लावर नही, फायर है!

06:58 AM Dec 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
फ्लावर नही  फायर है
Advertisement

नितीश रेड्डी चा मेलबर्नमध्ये जलवा : कसोटीतील पहिल्या शतकानंतर नितीशचा फिल्मी अवतार, पुष्पानंतर बाहुबली सेलिब्रेशन

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

एमसीजी ग्राऊंडवर सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीचा तिसरा दिवस नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी गाजवला. या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेट्ससाठी अक्षरश: रडवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 9 गडी गमावत 358 धावा केल्या होत्या. नितीश रेड्डी आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून नाबाद परतला आहे. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज क्रीझवर आहे. टीम इंडिया आता कांगारूंपेक्षा 116 धावांनी मागे आहे. विशेष म्हणजे, एमसीजी कसोटीदरम्यान कसोटीत पहिलेवाहिले शतक झळकावणाऱ्या नितीश कुमार रेड्डीची फिल्मी शैलीही पाहायला मिळाली. अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने पुष्पा स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले, तर त्याने बाहुबली स्टाईलमध्ये शतक साजरे केले. त्याचा हा चित्रपटातील लूक चाहत्यांना आवडला आहे.

Advertisement

टीम इंडियाने दुसऱ्या दिवसापर्यंत 164 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. इथून भारतीय संघ पहिल्या डावात मोठी धावसंख्या गाठू शकणार नाही असे वाटत होते. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने 191 धावांच्या स्कोअरवर सहावी तर 221 धावांवर सातवी विकेट गमावली. यानंतर जवळपास सर्वच आशा मावळल्या. पण, युवा फलंदाज नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी जबाबदारी स्वीकारली आणि आठवी विकेट पडेपर्यंत संघाला 348 धावांपर्यंत नेले.

ऋषभ पंत, जडेजाची निराशा

तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने 5 बाद 164 धावांवर पुढे खेळायला सुरुवात केली. पण वीस धावांची भर घातल्यानंतर ऋषभ पंत (28) खराब फटका मारुन बाद झाला. रविंद्र जडेजालाही काही विशेष कामगिरी करता आली नाही. जडेजाला 17 धावांवर लियॉनने तंबूचा रस्ता दाखवला. वास्तविक, नितीश जेव्हा फलंदाजीसाठी उतरला तेव्हा भारतीय संघ अडचणीत होता. टीम इंडियावर फॉलोऑनचे संकट होते. अशा कठीण परिस्थितीत नितीश रेड्डी व वॉशिंग्टन सुंदर यांनी भारताला फॉलोऑनपासून वाचवले. या जोडीने आठव्या गड्यासाठी 127 धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारत भारताला पुन्हा सामन्यात परत आणले.

नितीशचा शतकी धमाका, वॉशिंग्टनची सुंदर खेळी

तारणहार ठरलेल्या नितीश रेड्डीने उत्कृष्ट फलंदाजी करत आपले पहिले कसोटी शतक झळकावले. 99 धावांवर असताना त्याने बोलँडच्या गोलंदाजीवर दणदणीत चौकार लगावत आपले कसोटी शतक पूर्ण केले. नितीशने 173 चेंडूत 10 चोकार आणि एका षटकारासह 105 धावांची अद्वितीय खेळी केली. वॉशिंग्टननेही त्याला साथ देताना 162 चेंडूत 1 चौकारासह 50 धावा केल्या. नितीश 97 धावांवर असताना वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. यानंतर मैदानात आलेला बुमराहला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर मोहम्मद सिराज मैदानावर आला. सिराज किती चेंडू खेळू शकेल, याची सर्वांनाच चिंता होती. पण सिराजने बचावात्मक फलंदाजी करत कमिन्सचे षटक खेळून काढलं आणि पुढच्या षटकात नितीश रेड्डीला स्ट्राईक दिली. नितीश रे•ाrने एक डॉट बॉल खेळत पुढच्या चेंडूवर चौकार लगावत आपल्या पहिल्यावाहिल्या शतकाचे स्वप्न पूर्ण केले. पावसाचा व्यत्यय आल्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. यावेळी दिवसअखेरीस भारताने 116 षटकांत 9 गडी गमावत 358 धावा केल्या होत्या. नितीश 105 तर सिराज 2 धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव 474

भारत पहिला डाव 116 षटकांत 9 बाद 358 (यशस्वी जैस्वाल 82, विराट कोहली 36, ऋषभ पंत 28, नितीश कुमार रेड्डी खेळत आहे 105, वॉशिंग्टन सुंदर 50, सिराज खेळत आहे 2, पॅट कमिन्स व स्कॉट बोलँड प्रत्येकी दोन बळी).

ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा नितीश तिसरा युवा भारतीय

बॉक्ंिसग डे कसोटीत 21 वर्षीय नितीशने शानदार खेळी साकारताना 171 चेंडूत आपले कसोटी शतक साजरे केले. या शतकी खेळीसह तो ऑस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक झळकावणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. यासह त्याने 76 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. नितीशने वयाच्या 21 वर्षे 216 दिवसांत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक झळकावण्याचा पराक्रम केला. 1948 मध्ये अॅडलेडमध्ये वयाच्या 22 व्या वर्षी 46 दिवसांत कसोटी शतक झळकावणाऱ्या दत्तू फडकरला त्याने मागे टाकले. कमी वयात शतक झळकावणाऱ्या यादीत नितीशच्या पुढे आता सचिन तेंडुलकर व ऋषभ पंत आहेत.

ऑस्ट्रेलियात पहिले शतक झळकावणारे युवा भारतीय

18 वर्षे 256 दिवस - सचिन तेंडुलकर, सिडनी 1992

21 वर्षे 92 दिवस -  ऋषभ पंत, सिडनी 2019

21 वर्षे 216 दिवस - नितीश रेड्डी मेलबर्न 2024

22 वर्षे 46 दिवस - दत्तू फडकर, अॅडलेड 1948.

अर्धशतकास पुष्पा तर शतकास बाहुबली, नितीश कुमारचे हटके सेलिब्रेशन

बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात युवा खेळाडू ‘नितीश कुमार रेड्डीने शानदार शतक झळकावले. त्याचे हे कसोटीतील पहिलेच शतक ठरले. विशेष म्हणजे, नितीशने अर्धशतक झळकावल्यानंतर पुष्पासारखे सेलीब्रेशन केले, तर शतक झळकावल्यानंतर बाहुबलीसारखे आयकॉनिक सेलीब्रेशन केले. नितीशच्या या हटके सेलिब्रेशन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे.

बापाचा त्याग अन् लेकाची कमाल

नितीश कुमारला पाठिंबा देण्यासाठी त्याचे संपूर्ण कुटुंब ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहे. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीशचे वडिल मुत्याला व काका स्टेडियममध्येच उपस्थित होते. नितीशच्या शतकापूर्वी, कॅमेरे सतत मुत्याला यांच्यावर लक्ष केंद्रित करत होते आणि ते खूपच चिंतेत असलेले दिसत होते. जेव्हा नितीशने चौकारांसह शतक पूर्ण केले तेव्हा त्त्यांनी हात जोडून आकाशाकडे पाहिले. यावेळी ते भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू डोळ्यात तरळले. नितीश कुमार रेड्डीचा क्रिकेट प्रवास सोपा नव्हता. त्याच्या वडिलांनी त्यांच्या करिअरसाठी स्वत:ची नोकरी सोडली. पण नितीश आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार म्हणून उदयास आला आहे, हे त्याच्या वडिलांच्या मेहनतीचे फळ आहे.

Advertisement
Tags :

.