अण्वस्त्रांच्या प्रथम वापरावर बंदीचे धोरण नाही : पाकिस्तान
अण्वस्त्रs पूर्णपणे तयार असल्याची पाकिस्तानी सैन्याची घोषणा : भारताला धमकी
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
भारतातील लोकसभा निवडणुकीदरम्यान पाकिस्तानच्या अण्वस्त्रशक्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उपरोधिक टिप्पणी केली होती. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आता भारताला अण्वस्त्रांची धमकी देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्रसाठ्यांची देखरेख करणाऱ्या नॅशनल कमांड अथॉरिटीचे सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) खालिद अहमद किदवई यांनी पाकिस्तानचे अण्वस्त्रांवरून कुठल्याही प्रकारचे ‘नो फर्स्ट यूज’चे धोरण नसल्याचे म्हटले आहे. ‘नो फर्स्ट यूज’ धोरणाचा अर्थ स्वत:कडुन प्रथम अण्वस्त्रs न वापरण्याची तरतूद आहे. भारत ‘नो फर्स्ट यूज’ धोरणाचे पालन करतो. पाकिस्तानच्या रणनीतिकारांना भारताच्या ‘नो फर्स्ट यूज’ धोरणावरून संशय आहे. भारताने स्वत:च्या डॉक्ट्रिनमध्ये कुठल्याही अण्वस्त्रसज्ज देशावर आण्विक हल्ला करणार नाही, परंतु एखाद्याने आण्विक हल्ला केला तर अण्वस्त्रांद्वारे चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे नमूद केले आहे. नो फर्स्ट युजचे धोरण बदलले जावे अशी मागणी भारतात उपस्थित होत आहे. परंतु यासंबंधी अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. भारतात सुरू असलेल्या या चर्चेमुळे पाकिस्तानी सैन्य नेतृत्वात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे पूर्णपणे तयार अण्वस्त्र प्रत्येक पाकिस्तानी नेत्याला थेट भारताच्या नजरेला भिडून स्वत:चे म्हणणे मांडण्याचा आणि कधीच न झुकण्याचे स्वातंत्र्य आणि साहस देत असल्याचा दावा किदवई यांनी केला आहे. पाकिस्तान नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत देशाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला मजबूत करत आहे. पाकिस्तानचे सैन्य, नौदल आणि वायुदल तिघांकडेही अण्वस्त्रs आहेत. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांद्वारे 2750 किलोमीटरपर्यंतच्या भारतीय भूभागाला लक्ष्य केले जाऊ शकते अशी वल्गना किदवई यांनी केली आहे.