प्राणप्रतिष्ठादिनी सुटीबाबत अद्याप निर्णय नाही!
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
अयोध्येत राममंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त अनेक राज्यांनी सार्वत्रिक सुटी जाहीर केली आहे. भाजपसह विविध संघटनांनी कर्नाटकातही या दिवशी सार्वत्रिक सुटी जाहीर करण्याची मागणी केली आहे. याविषयी शनिवारी स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 22 रोजी राज्यात सार्वत्रिक सुटी घोषित करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते कोटा श्रीनिवास पुजारी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र पाठवून 22 जानेवारी रोजी सुटी जाहीर करण्याची विनंती केली. भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी देखील हीच मागणी केली आहे. या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता सिद्धरामय्या यांनी, भाजपने रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमादिवशी सुटी देण्याच्या मागणीचे दिलेले निवेदन अद्याप बघितलेले नाही. ते बघेन. सुटीविषयी निर्णय घेतलेला नाही, असे उत्तर दिले. अयोध्येला जाणार का, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी इतर दिवशी तेथे जणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. तुम्ही हा प्रश्न पुन्हा पुन्हा का उपस्थित करत आहात, असा प्रतिप्रश्न केला.
अयोध्येत 22 रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा होणार असून या दिवशी राज्यातील शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्याची मागणी शिक्षणमंत्र्यांकडे काही संघटनांनी केली आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी, मी या बाबतीत कोणताही वाद निर्माण करणार नाही. मी रामाचा निस्सीम भक्त आहे. मात्र, भाजप नेते श्रीरामाच्या मुद्द्यावरून राजकारण करत आहेत. 22 रोजी शाळा-महाविद्यालयांना सुटी द्यावी का, याविषयी मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यांनी आदेश दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे इतकेच आमचे काम असते, असे सांगितले.