विषारी दारुबळींना नुकसानभरपाई नाही!
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची घोषणा, भाजपकडून जोरदार टीकास्त्र
@ पाटणा / वृत्तसंस्था
बिहारमधील विषारी दारुच्या बळींची संख्या आता 65 पर्यंत पोहचली आहे. ती अजूनही वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दारु पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांच्या आप्तस्वकीयांना नुकसानभरपाईपोटी सानुग्रह अनुदान देण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, नितीशकुमार हेच या भीषण दुर्घटनेसाठी जबाबदार आहेत आणि ते या जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाहीत, असे भाजपने सुनावले आहे.
नितीशकुमारांनी सरकारची अनुदानासंबंधीची भूमिका विधानसभेत स्पष्ट केली. ‘तिपोगे तो मरोगे’ या त्यांच्याच वाक्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. लोकांनी अवैध दारुला स्पर्शही करुन नये, असे आवाहन त्यांनी केले. जे मद्यपानाचे समर्थन करतात, मद्यबंदीला विरोध करतात त्यांचा कधीही लाभ होणार नाही, असेही त्यांनी दारुबंदी मागे घेण्याचे आवाहन करणाऱया स्वतःच्या पक्षातील आमदारांना उद्देशून स्पष्ट केले. राज्यात मद्यबंदीचे धोरण सुरुच राहील, हा निर्धार व्यक्त केला.
पोलीस शिपाई निलंबित
ज्या पोलीस स्थानकाच्या क्षेत्रात ही घटना घडली त्या मसरख स्थानकाचा अधिकारी रितेश मिश्रा आणि एका कॉन्स्टेबलला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. विषारी दारु गाळणाऱयाचा शोध सुरु आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला नोटीस दिली असून चार आठवडय़ांमध्ये उत्तर देण्याची सूचना केली आहे. बिहार सरकारने अद्याप नोटीस आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. राज्य सरकारने कायद्याची अंमलबजावणी केली जाईल असे स्पष्ट केले.
भाजपचे शरसंधान
बिहार सरकारवर भाजपने शरसंधान केले असून राज्य सरकारकडे दारुबळींना अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे. राज्य सरकारने दारुबंदी क्रियान्वित करताना अक्षम्य चुका केल्या आहेत. राज्यात सध्या दारु आणि भ्रष्टाचार हेच या सरकारचे वैशिष्टय़ आहे. हाच या सरकारचा कार्यक्रम आहे. राज्य सरकार गुन्हेगारांना समर्थन आणि संरक्षण देत आहे, असा आरोप भाजपने केला.
सरकार रद्द करा
बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती पूर्णतः बिघडलेली असून ती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे राज्यपालांनी राज्य सरकार बरखास्त करण्याची सूचना केंद्र सरकारला करावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे. भाजपच्या नेत्यांनी शुक्रवारी राज्यपालांना केली. अनेक भाजप नेत्यांनी विरोधी पक्षनेते विजयकुमार सिन्हा यांच्या नेतृत्वात राज्यपालांना निवेदन दिले आहे. संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून आतापर्यंत हजारो लोक विषारी दारु, अपहरण आणि हत्या यांचे बळी ठरलेले आहेत. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, असा आरोपही भाजपने केला.
संसदेतही मुद्दा उपस्थित
बिहारमधील विषारी दारुकांडाच्या मुद्दय़ाचे पडसाद शुक्रवारी संसदेतही उमटले. भाजपच्या बिहारमधील खासदारांनी नितीश कुमार सरकारवर टीकेचे प्रहार करून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. बिहार सरकार सामुहिक हत्या करत आहे, असा गंभीर आरोप काही खासदारांनी केला. जो दारु पिणार तो मरणार, असे नितीश कुमार म्हणतात. पण ते अशी अवैध दारु विकणाऱयांना आणि निर्माण करणाऱयांना तिकिट देतात. मग राज्यातील अवैध दारुविक्री बंद कशी होणार? असा प्रश्न काही खासदारांनी विचारला. जनतेने दारु प्यायची नसेल तर राज्य सरकारने दारुविक्री बंद करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. पण सत्ताधारी युतीचेच नेते अशा व्यवसायांमध्ये असल्यामुळे या सरकारकडून दारुबंदीची अंमलबजावणी गंभीरपणे होईल अशी शक्यताच नाही, असेही खासदारांचे म्हणणे होते.