केएससीएवर बळजबरी कारवाई नको!
उच्च न्यायालयाचे निर्देश : एफआयआर रद्दसाठी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचा कायदेशीर लढा
प्रतिनिधी/ बेंगळूर
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए), डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट आणि आरसीबी व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. त्यामुळे केएससीएने प्रकरणासंबंधी आपल्याविरुद्ध दाखल झालेला एफआयआर रद्द करावा, अशी याचिका दाखल केली आहे. सोमवारी त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने केएससीएला दिलासा दिला असून केएससीए व्यवस्थापन समितीच्या सदस्यांवर पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही बळजबरी कारवाई करू नये, असा आदेश दिला आहे.

केएससीएचे अध्यक्ष रघुराम भट, सचिव ए. शंकर, खजिनदार ई. एस. जयराम यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायमूर्ती कृष्णकुमार यांच्या पीठाने हा आदेश दिला. तसेच याचिकाकर्त्यांनी चौकशीला सहकार्य करावे, न्यायालयाची अधिकारक्षेत्राबाहेर जाऊ नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले. पुढील आदेशापर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही तडकाफडकी कारवाई करू नये, असा आदेश देत न्यायालयाने सुनावणी 16 जूनपर्यंत पुढे ढकलली.
सरकार चेंगराचेंगरीच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करत आहे. जिल्हा दंडाधिकारी चौकशी करत आहे. शिवाय या प्रकरणाचा तपास सीआयडीकडेही सोपविण्यात आला आहे. उच्च न्यायालयानेही स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
एफआयआर दाखल होताच केएससीएचे अध्यक्ष रघुराम भट, सचिव ए. शंकर, खजिनदार ई. एस. जयराम यांनी याचिका दाखल केली आहे. प्रकरणासंबंधी नुकताच युडीआर दाखल करण्यात आला आहे. आता एफआयआरही दाखल झाला आहे. एकाच प्रकरणासंबंधी दोन पद्धतीने तपास करणे बेकायदेशीर आहे. उच्च न्यायालयानेही स्वत: जनहित याचिका दाखल करून चौकशी सुरू केली आहे. असे असताना आणखी एक एफआयआर दाखल करून चौकशी करता येत नाही. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची सरकारची कृती अधिकाऱ्यांचे अपयश दर्शविते. ही घटना अचानक आणि अनवधानाने घडली आहे. तरी देखील याचिकाकर्त्यांना आरोपी बनवून एफआयआर दाखल करणे कायद्याचा दुरुपयोग ठरेल, असा युक्तिवाद केएससीएच्या वकिलांनी केला आहे.
आरसीबी संघाच्या खेळाडूंचा सत्कार करण्याचा कार्यक्रम विधानसौध येथे आयोजिण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री, अधिकारी त्यावेळी उपस्थित होते. आरसीबीचे खेळाडू विधानसौधहून स्टेडियमकडे जात असताना चेंगराचेंगरीची घटना घडली. आरसीबी फ्रँचायझी व पोलीस अधिकाऱ्यांकडे चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवरील गर्दी नियंत्रणाची जबाबदारी होती. घटनेचे खापर केएससीएवर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. चिन्नास्वामी कर्नाटकातील क्रिकेट नियंत्रण एवढीच केएससीएची जबाबदारी आहे. केएससीए स्टेडियम भाडोत्री देते. तथापि प्रेक्षक व चाहत्यांवर कोणत्याही प्रकारे नियंत्रण ठेवत नाही, असे केएससीएने याचिकेत म्हटले आहे.
त्यामुळे घटनेला याचिकाकर्तेच कारणीभूत असल्याचा कोणताही पुरावा नाही. पोलिसांनी दबावापुढे झुकून याचिकाकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असे केएससीएने याचिकेत म्हटले आहे.
घटनेसंदर्भात याचिकाकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याचिकाकर्त्याला अटक करावी की नाही हे तपास अधिकाऱ्यांनी ठरवावे. मुख्यमंत्र्यांनी अशी सूचना देण्याचा अधिकार नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी सूचना जारी केल्याने पोलीस अधिकाऱ्यांना त्याचे पालन करावे लागेल. त्यामुळे समाजातील प्रतिष्ठीत असणाऱ्या याचिकाकर्त्याचा अवमान होईल. त्यामुळे एफआयआर व त्यासंबंधीची पुढील चौकशी प्रक्रिया रद्द करावी, अशी विनंतीही न्यायालयाकडे करण्यात आली.
सरकार विरुद्ध केएससीए संघर्षाची चिन्हे
आरसीबी संघाच्या विजयोत्सवावेळी बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा बळी गेला होता. या घटनेला राज्य सरकारने कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए) कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल केला आहे. आता केएससीएने सरकारनेच आरसीबीच्या विजयोत्सवाची हाक दिली होती, असा आरोप केला आहे. त्यामुळे राज्य सरकार विरुद्ध केएससीए असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
चौघांना अटक : 19 पर्यंत न्यायालयीन कोठडी
चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात एफआयआर दाखल झाल्याने शुक्रवारी आरसीबीच्या मार्केटींग विभागाचे प्रमुख निखिल सोसले, सुमंत, डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीचे व्यवस्थापक किरण, कर्मचारी सुनील मॅथ्यू या चौघांना अटक करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या या चौघांना जबाबदार ठरवत ही कारवाई करण्यात आली. त्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांना बेंगळूरच्या 41 व्या एसीजेएम न्यायालयात हजर केले असता 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. कब्बनपार्क पोलीस व सीसीबी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत बेंगळूरच्या देवनहळ्ळीजवळील केंपेगौडा विमानतळावर वरील चौघांना अटक केली. तीन आयोजकांसह चौघेजण मुंबईला जात असताना ही कारवाई करण्यात आली.
विराट कोहलीविरुद्ध तक्रार
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी क्रिकेटपटू विराट कोहली याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिअल फायटर्स संघटनेचे एच. एम. वेंकटेश यांनी बेंगळूरच्या कब्बन पार्क पोलीस स्थानकात कोहलीविरुद्ध तक्रार दिली आहे. आरसीसी व्यवस्थापनाविरुद्ध गुरुवारीच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आता कोहलीविरुद्ध एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे.
भाजपकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांविरुद्ध तक्रार
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधी पक्ष भाजप आणि निजदने राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर हेच दुर्घटनेला कारणीभूत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार भाजपने कब्बन पार्क पोलिसांत दिली आहे. राज्य भाजपचे मुख्य सचिव पी. राजीव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कब्बन पार्क पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सार्वजनिक निधीचा दुरुपयोग आणि निष्पाप लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मानवाधिकार आयोगाकडून सुमोटो खटला
चेंगराचेंगरीच्या घटनेत आरसीबीच्या 11 चाहत्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची राज्य मानवाधिकार आयोगानेही गांभीर्याने दखल घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष श्याम भट, सदस्य सुरेश, डीवायएसपी सुधीर
हेगडे, मोहन यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी चिन्नास्वामी स्टेडियमला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्याम भट म्हणाले, चेंगराचेंगरीच्या घटनेत 11 जण मृत्यूमुखी पडले. 70 जण जखमी झाले. बौरिंग आणि वैदेही इस्पितळात प्रत्येकी 2 जण उपचार घेत आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका नव्हती, योग्य वेळेत गेट उघडण्यात आले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. मानवाधिकार आयोगाकडून दोन खटले दाखल करण्यात आले आहेत. बेंगळूर पोलीस आयुक्त, आरोग्य खात्याचे सचिव आणि स्टेडियम व्यवस्थापनावर सुमोटो खटला दाखल केला आहे. तसेच कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे.
गोविंदराज यांना मुख्यमंत्र्यांच्या राजकीय पदावरून हटविले
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीच्या घटनेला काही अंशी कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव के. गोविंदराज यांना पदावरून हटविण्यात आले आहेत. यासंबंधीचा आदेश गुरुवारी जारी करण्यात आला. गोविंदराज यांच्यावर दबाव आल्याने त्यांनी विधानसौध आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विजयोत्सव आयोजनाला परवानगी दिल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. गोविंदराज हे कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. आरसीबीच्या विजयोत्सवाचे घाईगडबडीत आयोजन करण्यास परवानगी दिल्याने अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवपदावरून मुक्त करण्यात आले आहे.