महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ना जल्लोष...ना आतषबाजी...फक्त मतमोजणी

11:22 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्र परिसरात शुकशुकाट

Advertisement

बेळगाव : उत्साहाने सळसळणारे कार्यकर्ते, त्यांचा जल्लोष, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, पुष्पहार आणि फुलांचा वर्षाव, मिठाईचे वाटप, विजयी उमेदवाराला खांद्यावर घेऊन नाचणारे खंदे समर्थक असे कोणतेही चित्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी दिसले नाही. किंबहूना यावर्षी प्रथमच अत्यंत तुरळक संख्येने कार्यकर्ते दिसून आले. बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी आरपीडी कॉलेज येथे पार पडली. परंतु आरपीडी परिसरात कार्यकर्त्यांचा तितकासा उत्साह दिसून आला नाही. देशात भाजपची झालेली पिछेहाट पाहता काही मोजकेच कार्यकर्ते निकालाच्या ठिकाणी आले होते. स्थानिक कार्यकर्त्यांपेक्षा बाहेरील कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे दरवेळी मतमोजणीवेळी दिसून येणारा कार्यकर्त्यांचा जल्लोष पहायला मिळाला नाही. इतकेच नव्हे तर कार्यकर्त्यांची संख्याही रोडावल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

Advertisement

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आरपीडी चौक परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहनचालकांना गोवावेस कॉर्नर व अनगोळ कॉर्नर येथूनच मागे पाठविले जात होते. गोवावेस ते अनगोळ कॉर्नर या दरम्यानचा एका बाजूचा रस्ता बॅरिकेड्स लावून बंद ठेवण्यात आला होता. तर एका बाजूचा रस्ता कार्यकर्त्यांसाठी खुला ठेवण्यात आला. परंतु आरपीडी कॉर्नरपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना एकतर अनगोळ नाका अथवा गोवावेस कॉर्नर येथे वाहने लावून चालत यावे लागले. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तरी सकाळी 11 वाजेपर्यंत आरपीडी परिसरात शुकशुकाट होता. मागीलवर्षी झालेल्या विधानसभा मतमोजणीवेळी काही अल्पवयीन मुलांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मतमोजणी परिसरात गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेतली होती. त्यामुळे मोजकेच कार्यकर्ते मतमोजणी परिसरात दाखल झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मतमोजणी केंद्राच्या चारही बाजूने बंदोबस्त ठेवला होता. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जात होते. कोठेही कार्यकर्ते एकत्र येवून घोषणा देऊ लागले तरी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात होते. संपूर्ण परिसरावर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बनँग, उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह इतर पोलीस अधिकारी लक्ष ठेवून होते. कार्यकर्त्यांना माहिती मिळावी यासाठी आरपीडी कॉर्नर येथे लावण्यात आलेली एलईडी स्क्रीन वापराविना राहिली.

कार्यकर्त्यांचा हिरमोड

बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठे यश मिळाले. यामुळे जल्लोष करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होईल, असा अंदाज होता. मात्र मोजक्याच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. यामुळे अरभावी, गोकाक, रामदुर्ग येथून आलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. विजयानंतर जगदीश शेट्टर आरपीडी परिसरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.

नोकरदारांचे झाले हाल...

आरपीडी परिसरात अनेक खासगी कार्यालये, व्यावसायिक आस्थापने आहेत. मुख्य रस्त्यावरील सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली होती. परंतु खासगी कार्यालये सुरू होती. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना गोवावेस सर्कल येथे वाहने पार्किंग करून तेथून पायपीट करत कार्यालय गाठावे लागल्याने नाराजीचा सूर उमटत होता. याबरोबरच टिळकवाडीच्या दुसऱ्या भागात असणाऱ्या शाळांना जाण्यासाठी रस्ता बंद असल्याचा विद्यार्थ्यांनाही फटका बसला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article