नोव्हेंबरपर्यंत प्रदेशाध्यक्ष बदल नाही
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भूमिका : काही मंत्र्यांच्या दबावावर स्पष्टीकरणे
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असतानाच सिद्धरामय्या यांनी मीच पाच वर्षासाठी मुख्यमंत्री असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे काही मंत्र्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नोव्हेंबरपर्यंत प्रदेशाध्यक्ष बदल नको, असे ठामपणे सांगून भूमिका स्पष्ट केल्याचे समजते.
पक्षाच्या अलिखित नियमाप्रमाणे एक व्यक्ती एक पद याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी काही मंत्र्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. परंतु खर्गे यांनी त्यावर स्पष्ट उत्तर दिले आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्वरित ही मागणी का केली काही. सध्या विविध राज्यांत निवडणुका आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदल करणे कठीण आहे. नोव्हेंबरपर्यंत कोणतेही बदल नकोत, असे खर्गेंनी सांगितल्याचे समजते.
यावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार डी. के. सुरेश यांनी, डी. के. शिवकुमार यांना संख्याबळ प्रदर्शित करण्याची गरज नाही. ते प्रामाणिकपणे पक्ष पुढे नेत आहेत. कोणत्याही आमदारांचा पाठिंबा मागण्याची वेळ आलेली नाही, असे सांगितले आहे. शिवकुमार यांच्या समर्थक आमदारांनी गेल्या महिनाभरापासून मुख्यमंत्री बदलण्यासंबंधी उघडपणे वक्तव्ये केली आहेत. सरकारला डिसेंबरमध्ये अडीच वर्षे पूर्ण होत असल्याने अधिकार हस्तांतराबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असतानाच सिद्धरामय्या यांनी पूर्ण कालावधीसाठी मीच मुख्यमंत्री असल्याचे वारंवार म्हटले आहे.
याच दरम्यान, काही प्रमुख मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणला आहे. परंतु, सध्यातरी कोणतेही बदल नसल्याचे मल्लिकार्जुन खर्गेंनी स्पष्ट केले आहे.
राजकारणात कधीही क्रांती होऊ शकते : तन्वीर सेठ
एकीकडे मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत चर्चा होत असतानाच काँग्रेसचे मंत्री के. एन. राजण्णा यांनी सप्टेंबरमध्ये राजकारणात क्रांती होईल, असे वक्तव्य केले होते. त्यापाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक आमदार तन्वीर सेठ यांनी वक्तव्य केले आहे. राज्यात कधीही क्रांती होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. म्हैसूरमध्ये शनिवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री बदलाविषयी प्रसारमाध्यमांपुढे बोलणार नाही. 5 वर्षे आमचे सरकार सुस्थितीत राहील. पक्षामुळे सरकार आहे. कोणतेही अधिकार शाश्वत नाहीत. कोणीतरी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत राहिले तर विषय संपणार नाही. काँग्रेस पक्षात कधीही क्रांती होऊ शकते. मंत्रिमंडळ पुनर्रचना केव्हाही होऊ शकते. ते होईपर्यंत पक्षावर विश्वास ठेवत प्रतीक्षा करत आहे.
आता मंत्र्यांशी चर्चेसाठी सुरजेवाला 17 रोजी बेंगळुरात
राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी दोन टप्प्यात राज्यातील आमदारांशी चर्चा करून हायकमांडकडे अहवाल सादर केला आहे. आता मंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी सुरजेवाला 17 जुलै रोजी बेंगळुरात येणार आहेत. यावेळी ते मंत्र्यांची स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणार असल्याचे समजते.
सुरजेवाला यांच्या कार्यपद्धतीवर राज्य काँग्रेस गोटात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त उमटल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे काँग्रेसमधील प्रभावी नेते असूनही त्यांना दूर ठेवून सुरजेवाला यांनी थेट आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेत त्यांची सरकार व मंत्र्यांविषयी मते जाणून घेतली आहेत. त्यामुळे काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. केवळ आमदारांशीच नव्हे तर मंत्र्यांशीही चर्चा करण्यासाठी सुरजेवाला पुढे सरसावले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा उलटसुलट चर्चेला वाव मिळाला आहे. मतदारसंघांत कोणता विकास झाला आहे?, आमदारांच्या मागण्यांना मंत्री कसा प्रतिसाद देतात?, यावर मंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचे समजते. याशिवाय केडीपी बैठक, खात्यांमधील विकासकामे, पक्षसंघटनेत योगदान, नव्या योजना याविषयीही सुरजेवाला मंत्र्यांशी चर्चा करतील. सुरजेवाला आमदार व मंत्र्यांशी विविध स्तरावर मते जमा करत असल्याचे पाहिले तर महत्त्वपूर्ण राजकीय बदलाची शक्यता नाकारता येत नाही.