काळा रोब नको, भारतीय वेष असावा
केंद्र सरकारची पदवीदान समारंभांसाठी सूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पदवीदान समारंभ कार्यक्रमांमध्ये काळा झगा (रोब) उपयोगात आणला जाऊ नये अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. काळ्या रोबच्या स्थानी भारतीय वेषभूषा करण्यास प्राधान्य दिले जावे, असेही केंद्र सरकारच्या वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे. काळा झगा उपयोगात आणणे हे वसाहतवादी मानसिकतेचे लक्षण असल्याने आता त्यापासून मुक्ती घ्यावयास हवी, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. भारतीयांनी आपल्या प्रत्येक आचारविचारात भारतीयत्व जोपासण्याची आवश्यकता आहे, असे निर्धारण केंद्र सरकारने केलेले असून त्यानुसार पावले पडत आहेत.
वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि इतर संस्थांसाठी प्रामुख्याने ही सूचना आहे. केंद्र सरकारचा वैद्यकीय विभाग लवकरच पदवीदान समारंभांसाठी नवी वेषभूषा संहिता लागू करणार आहे. अशा कार्यक्रमांमध्ये कोणती वेषभूषा असावी यासंबंधी सर्व संस्थांना सूचना करण्यात येणार आहेत. भारतात पूर्वापारपासून चालत आलेल्या परंपरांना अनुसरुन किंवा संस्था ज्या प्रदेशात कार्यरत आहे, त्या प्रदेशाच्या परंपरांना अनुसरुन वेषभूषा करावी. भारतीयत्वाला प्राधान्य द्यावे, असे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
‘पंच प्राण’ घोषणेला अनुसरुन...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंच प्राण’ किंवा पाच निर्धार ही घोषणा नुकतीच केली आहे. भारताने ब्रिटिशांच्या वसाहतवादी प्रभावातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वदेशीकरणावर भर दिला जात आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ब्रिटीश आचारविचार किंवा त्या संस्कृतीची वेषभूषा यांना फाटा देऊन भारतीय परंपरांना अनुसरुन वेषभूषा करावी, असा आदेश काढण्यात आला.
प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
पदवीदान कार्यक्रम किंवा सरकारच्या पातळीवर होणारे सार्वजनिक कार्यक्रम साजरे करताना भारतीय पद्धतीच्या आणि भारतीय परंपरेच्या वेषभूषांना महत्त्व दिले जावे. भारतीय वेषभूषा आणि तिच्या संबंधीची आचारसंहिता कशी असावी, यासंबंधी प्रस्ताव पाठविले जावेत, असे आवाहन केंद्राने लोकांना केले आहे.
‘पंच प्राण’ कोणते आहेत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 च्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून भाषण करताना, ‘पंच प्राण’ तत्त्वांची घोषणा केली होती. पारतंत्र्याच्या काळात निर्माण झालेल्या वसाहतवादी मानसिकतेचा प्रभाव पूर्णत: संपविणे, भारताच्या सर्वांगिण विकासाचा निर्धार, पुरातन भारतीय परंपरेचा अभिमान, भारतीय नागरिक या नात्याने आपल्या सर्व कर्तव्यांचे पालन प्रामाणिकपणे करणे आणि एकात्मता बाणणे, असे पाच निर्धार त्यांनी भारताला दिले होते. केंद्र सरकारच्या वैद्यकीय विभागाने त्याच्या अंतर्गत संस्थांवर ते लागू केले आहेत.