प्रतिमा बसविल्याशिवाय माघार नाही!
राष्ट्रपुरुषांचा अवमान; शिल्पे बसविण्यास विलंब : रेल्वेस्थानकासमोर धरणे आंदोलन
प्रतिनिधी/ बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पे रेल्वेस्थानकात बसविल्याशिवाय आता माघार घेणार नाही, असे म्हणत कर्नाटक दलित संघर्ष समितीने बुधवारी बेळगाव रेल्वेस्थानकासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली. राष्ट्रपुरुषांचा नैर्त्रुत्य रेल्वेकडून अवमान केला जात असून हे न थांबविल्यास न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा आंदोलकांनी दिला. यामुळे रात्री उशिरापर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले.
190 कोटी रुपये खर्च करून भारतीय रेल्वेने बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण केले. 27 फेब्रुवारी 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेस्थानकाचे उद्घाटन झाले. रेल्वेस्थानकाचे उद्घाटन होत असताना मुख्य प्रवेशद्वारावर बेळगावमधील ऐतिहासिक घटना व व्यक्तींची शिल्पे लावण्यात आली. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प बसविण्यात न आल्याने नाराजी व्यक्त होत होती.
कर्नाटक दलित संघर्ष समिती व श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने झालेल्या आंदोलनानंतर रेल्वेच्या गोडावूनमध्ये ठेवलेली शिल्पे अखेर प्रवेशद्वारासमोर आणून ठेवण्यात आली. त्यावेळी रेल्वेने दोन महिन्यांत शिल्पे बसविली जातील, असे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात दीड वर्ष उलटले तरी अद्याप या प्रतिमा बसविण्यात आल्या नसल्याने बुधवारी पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी दलित बांधवांसोबत मराठा समाजाचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमाकांत कोंडुसकर (अध्यक्ष श्रीराम सेना हिंदुस्थान)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची शिल्पे बसविण्यासाठीचे आंदोलन मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. परंतु, लाजीरवाणी गोष्ट म्हणजे ज्यांनी जगण्याचे स्वातंत्र्य दिले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, अशा महान व्यक्तींची शिल्पे बसविण्यासाठी वारंवार आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. रेल्वे प्रशासनाने स्वाभिमान व अभिमानाने या दोन्ही थोर पुरुषांची शिल्पे प्रवेशद्वारावर बसवावीत, यासाठी आंदोलन सुरूच ठेवणार आहे.
रवी बस्तवाडकर (पदाधिकारी दलित संघर्ष समिती)
देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु, स्वातंत्र्य मिळविण्यामध्ये योगदान दिलेल्यांचा मात्र पदोपदी अवमान केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पे दोन वर्षांपासून एकाच ठिकाणी ठेवली असून ती बसविण्याकडे जाणीवपूर्वक रेल्वे खात्याचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जोवर प्रतिमा बसविणार नाही, तोवर येथून हटणार नाही.
रेल्वेस्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप
कर्नाटक दलित संघर्ष समितीने शिल्पे बसविण्यासाठी आंदोलन पुकारल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य पोलीस विभागासह आरपीएफ जवान बुधवारी तैनात करण्यात आले होते. आंदोलन चिघळून कुठेही गालबोट लागू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे बेळगाव रेल्वेस्थानकाला बुधवारी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.