गोहत्या प्रतिबंध कायद्यात दुरुस्ती नको
विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे जोरदार निदर्शने : मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
बेळगाव : गोहत्या प्रतिबंध कायद्यातील दुरुस्तीला विरोध करत बुधवारी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्यावतीने चन्नम्मा चौकात जोरदार निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार केला. गोहत्या प्रतिबंधक आणि संरक्षण कायदा 2020 च्या कलम 8 (4) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दुरुस्ती त्वरित रद्द करून विधानसभेत ते मांडण्यात येऊ नये. या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. एकाच वाहनातून मोठ्या प्रमाणात गायींची वाहतूक केली जात होती. केवळ पैशासाठी निर्धारीत संख्येपेक्षा दहापट जास्त जनावरे एकमेकांवर निर्दयीपणे टाकली जात होती.
कायद्याची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक
2021 मध्ये वरील कायदा लागू झाल्यानंतर ही व्रुरता काही प्रमाणात कमी झाले. मात्र अद्यापही कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने जनावरांची वाहतूक सुरुच आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र जप्त केलेली वाहने काही कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सोडून दिली जात आहेत. भविष्यात हा कायदा आणखीन कडक करणे गरजेचे आहे. मात्र सरकारकडून कायद्यात बदल करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
कायदा कमकुवत करण्याच्या हालचाली
सरकारकडून कायदा कमकुवत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना कोणत्याही मार्गावरून वाहतूक करण्यास मुभा देण्यासह शिक्षा होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिणामी भविष्यात गोहत्येचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. त्यामुळेच गोहत्या प्रतिबंध कायद्यात सुधारणा करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.