रविवारी एनएमएस सराव चाचणी; माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजन;
राज्यातील पहिलाच प्रयोग; 69 केंद्रांवर होणार चाचणी
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग आणि चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे तात्यासाहेब मुसळे हायस्कूल व जुनिअर कॉलेज इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (10 डिसेंबर) जिल्हास्तरीय एन. एम. एम. एस सराव चाचणीचे आयोजन केले आहे.
मुख्य परीक्षा ज्या केंद्रांवरती होणार आहे, त्याच केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. मुख्य परीक्षेला सामोरे जाण्याची पूर्व तयारी म्हणून ही परीक्षा आयोजित केलेली आहे.
या परीक्षेचा एकूण 26 हजार 325 इतक्या विद्यार्थ्यांना लाभ होणार असून जिह्यातील एकूण 69 परीक्षा केंद्रावर ही चाचणी होणार आहे. या परीक्षेचे पेपर वितरण माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या दालनामध्ये चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कस्तुरे व तारे यांच्या हस्ते करण्यात आले. या परीक्षेचे पेपर प्रवीण आंबोळे (व्यंकटराव हाय इचलकरंजी) निवास फराकटे (दुधसाखर विध्यानिकेतन बिद्री) विजय सुतार ( वि म मादळे ) ए आर पाटील यांनी तयार केले असून उर्दू माध्यमाचे पेपर परवेज जहांगीर, शबाना मोमीन (अँग्लो उर्दू हाय कराड ) करमळकर गुलस्वार (नॅशनल हाय इचलकरंजी) इब्राहिम फैज अल्लामा (इकबाल हाय कुरुंदवाड) यांनी तयार केले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागामार्फत अशा प्रकारचा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम राबवला असून जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ताधारक होण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल असे मत माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केले.
परीक्षा वेळापत्रक
पेपर क्र 1 (स) सकाळी 10.30 ते 12 , पेपर क्र 2 (sat) 1.30 ते 3 या प्रमाणे असेल. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन आंबोकर यांनी केले आहे.