नितीशकुमारांकडून शुभंकर, लोगोचे अनावरण
वृत्तसंस्था/ पाटणा
नव्याने बांधण्यात आलेल्या राजगिर स्टेडियममध्ये 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या लोगोचे (बोधचिन्ह) व शुभंकरचे अनावरण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेच्या शुभंकरचे नामकरण ‘गुडीया’ असे करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या बोधचिन्हाच्या अनावरण समारंभामध्ये बिहारच्या क्रीडा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. बिहार राज्य क्रीडा प्राधिकरणाचे सरसंचालक रविंद्रन संकरन, हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग, तसेच भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार सलिमा टेटे आणि उपकर्णधार नवनीत कौर यांचा समावेश होता. आशियाई हॉकी फेडरेशच्या अध्यक्षांनी याप्रसंगी स्पर्धेच्या लोगो आणि शुभंकराबद्दल स्तुती केली. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनला बिहार शासनाकडून सातत्याने पाठींबा मिळत असल्याबद्दल हॉकी इंडियाचे प्रमुख दिलीप तिर्की यांनी आभार मानले आहेत. ‘सांस्कृतिक समृद्धी असलेल्या बिहारमध्ये महिलांची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे, हा भारतीय हॉकीसाठी अभिमानाचा क्षण आहे,’ अशा भावना भोल नाथ सिंग यांनी व्यक्त केल्या.