For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नितीशकुमारांनी जिंकला विश्वास प्रस्ताव

06:58 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
नितीशकुमारांनी जिंकला विश्वास प्रस्ताव
Advertisement

बिहार विधानसभेत बहुमत सिद्ध, विरोधकांचा सभात्याग, सभाध्यक्षांच्या निवडणुकीतही विजय

Advertisement

► वृत्तसंस्था / पाटणा

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या सरकारचे बहुमत बिहार विधानसभेत सिद्ध केले आहे. बहुमतासाठी 122 च्या संख्याबळाची आवश्यकता होती. तथापि, सरकारच्या बाजूने 129 सदस्यांचे संख्याबळ असल्याचेही यावेळी सिद्ध झाले होते. बिहार विधानसभेत एकंदर सदस्यसंख्या 243 असून एक जागा रिक्त आहे. बहुमत सिद्धतेपूर्वी नव्या विधानसभाध्यक्षांचीही निवड करण्यात आली.

Advertisement

नितीशकुमार यांनी 28 जानेवारीला विरोधी पक्षांच्या आणि बिहारमधील ‘महागठबंधन’ आघाडीतून आपल्या सर्व आमदारांसह बाहेर पडले होते. त्यांच्या संयुक्त जनता दल या पक्षाकडे विधानसभेचे 45 आमदार आहेत. त्यांनी त्याच दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्ष तसेच हिंदुस्थान अवाम मोर्चाशी युती करुन नवे सरकार स्थापन केले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधीही पार पडला होता.

नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड

सोमवारी विधानसभेच्या अधिवेशनाला सकाळी 11 वाजता प्रारंभ झाल्यानंतर प्रथम त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यावरील मतदानातच बहुमताची खरी कसोटी लागणार होती. हा प्रस्ताव नितीशकुमार यांच्या सरकारने 125 विरुद्ध 112 असा सहजगत्या जिंकला. त्यामुळे सरकारचे बहुमत तेव्हाच सिद्ध झाले होते. नवे विधानसभा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे आमदार नंदकिशोर यादव यांनी शपथग्रहण करुन पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर विश्वास प्रस्ताव सादर झाला.

विश्वासदर्शक प्रस्तावातही विजय

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एक ओळीचा विश्वासदर्शक प्रस्ताव सादर केला. त्यावर जोरदार चर्चा झाली. नितीशकुमार यांनी प्रस्ताव सादर करताना केलेल्या प्राथमिक भाषणात हे सरकार स्थिर असून आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर पूर्वीच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी कुमार यांच्यावर जोरदार टीका करणारे भाषण केले. अन्य काही सदस्यांनीही आपल्या पक्षाच्या समर्थनार्थ भाषणे केली.

ही कोणाची गॅरेंटी आहे?

नितीशकुमार यांनी विरोधी पक्षांचा विश्वासघात केला आहे. त्यांना जनताच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आतापर्यंत अनेकदा अशी पक्षांतरे केली आहेत. त्यांचे खरे प्रेम सत्तेवर आहे. आम्ही आता हा संघर्ष बाहेर लोकांमध्ये घेऊन जाणार असून लोकांकडेच न्याय मागणार आहोत. लोक आमच्या पाठीशी असल्याचा आमचा विश्वास आहे. त्यामुळे जनतेच्या न्यायालयातच आम्हाला न्याय मिळेल. नितीशकुमार पुन्हा पलटी मारणार नाहीत, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही, अशी टोलेबाजी तेजस्वी यादव यांनी त्यांच्या भाषणात केली.

 

नितीशकुमार यांचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी चर्चेला उत्तर देताना, आपण यापुढे कधीही राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडणार नाही, असे ठाम प्रतिपादन केले आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या आघाडीशी नाते जोडले आहे. 2005 मध्ये आमची भारतीय जनता पक्षाशी युती झाली होती. या युतीच्या काळात बिहारचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला. शोषण आणि अन्याय यापासून जनतेला मुक्ती मिळाली. मधल्या काळात यात खंड पडला होता. पण आता आमचे सरकार राज्याच्या विकासाला पूर्णपणे वाहून घेणार आहे, असे प्रतिपादनही त्यांनी भाषणात केले.

विरोधकांचा सभात्याग

विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदान होण्याआधीच विरोधकांनी सभात्याग केल्याने मतदानाशिवायच हा प्रस्ताव संमत झाला. तथापि, त्यावेळी सभागृहात सरकारच्या पक्षात विधानसभाध्यक्ष वगळता 129 सदस्य असल्याचे दिसून आले होते. अशा प्रकारे बिहार सरकार बहुमताच्या परीक्षेत सहजगत्या उत्तीर्ण झाले आहे.

‘खेला’ नितीशकुमारांच्याच बाजूने

नितीशकुमार यांनी विरोधकांची आघाडी सोडल्याने या आघाडीला बिहार सरकार गमवावे लागले होते. तथापि, विरोधकांच्या आघाडीने धीर सोडला नव्हता. तेजस्वी यादव ऐनवेळी ‘खेला’ करतील आणि कुमार यांना बहुमतापासून रोखतील अशी आशा या आघाडीला होती. जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवाम मोर्चा या पक्षाशी संधान बांधण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला. मांझी यांना मुख्यमंत्रिपदाचे आमिषही दाखविण्यात आले होते. एक अपक्ष आमदार, तसेच भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाचे काही आमदारही संपर्कात आहेत, असा दावा केला जात होता. तथापि, प्रत्यक्ष विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळी ‘खेला’ सरकारच्याच बाजूने झाला. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचेच दोन आमदार सत्ताधारी बाकांवर बसल्याचे आढळून आले. नंतर ही संख्या तीन झाली. अशाप्रकारे विरोधी आघाडीतच फूट पडल्याचे दिसून आले. मात्र, सत्ताधारी आघाडीचे सर्व आमदार आघाडीसोबतच असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

मंत्रिमंडळ विस्तार 19 ला

बिहारमधील नितीशकुमार मंत्रिमंडळाचा विस्तार 19 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. बिहारमध्ये मंत्रिमंडळात नियमानुसार मुख्यमंत्र्यांसह 37 मंत्री असू शकतात. सध्या मंत्र्यांची संख्या 9 मंत्री आहेत. पुढच्या विस्तारात आणखी 20 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. सत्तागटातील सर्व पक्षांना योग्य ते प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात देण्यात येईल, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.