Sangli Crime News : माव्याच्या उधारीवरुन कुख्यात गुंडाचा गेम, भर दुपारी बाजारातच खून
भर दुपारी बाजार परिसरातील घटना, कोयता व चॉपरने नितीन पालकवर वार, दोघांना अटक
इस्लामपूर : सराईत गुंड नितीन संजय पालकर (33 रा. किसानगर, इस्लामपूर) याचा माव्याची उधारी न दिल्याने पानपट्टी चालक व त्याच्या साथीदाराने कोयता व चॉपरने वर्मी वार करीत निर्घृण खून केला. ही घटना गुरुवारी भरदुपारी दीडच्या सुमारास शासकीय धान्य गोदामा समोरील अजिंक्य बजारसमोर रस्त्यावर घडली. गुरुवार व रविवार हा बाजाराचा दिवस असतो, याच परिसरात घटना घडल्याने दहशत पसरली. दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी दोघा संशयिताना अटक केली. तर या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करुन धूम ठोकली.
काही काळ सन्नाटा पसरला. नंतर घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात बघ्यांची गर्दी झाली. यश महेश माने (रा. टकलाई नगर) इस्लामपूर व वैभव दत्तात्रय थोरात (रा. मंत्री कॉलनी इस्लामपूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. मानेचे पान शॉप असून बुधवारी रात्री नऊच्या सुमारास माव्याचे पैसे देण्याच्या कारणावरुन दोघात वाद झाला होता. त्यानंतर यश माने हा पालकर यास तुझ्यात काय दम आहे बघतो, अशी धमकी व शिवीगाळ करीत होता.
गुरुवारी दुपारी पालकर हा मित्रांसमवेत पुन्हा माने याच्याकडे मावा घेण्यासाठी गेला. त्यावेळी माने समवेत वैभव थोरात होता. पालकर यास गुरुवारचे पैसे मागितले. त्यातून पुन्हा वादावादी होवून पालकरने माने यास क्युआर कोड फिकून मारला. त्यामुळे वादाची मोठी ठिणगी पडली. दरम्यान, मित्रांनी त्यांच्यातील भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. पण माने व त्याचा साथीदार थोरात यांनी कोयता व चॉपरने पालकर याच्या अंगावर वार केले. तर पालकरचा नातेवाईक करण आनंदा जाधव (21 रा. किसानगर) याच्या कानफटीत मारुन त्यास ठार मारण्याची धमकी दिली.
पालकर हा रक्ताच्या थारोळ्यात पानपट्टी समोरच कोसळल्या नंतर यश माने साथीदार थोरात यांनी पलायन केले. दरम्यान, पोलीस उपाधिक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही काळ रस्ता बंद करुन घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर पालकरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. पालकर याच्या डोक्यात, हातावर, पोटावर गंभीर वार झाले आहेत. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
पालकरच्या खूनाची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी गर्दी झाली. परिसरात पोलीस बंदोबस्त होता. पालकरचे मित्र व पत्नीसह अन्य नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. पालकरने सन 2016 पासून आज अखेर अनेक गुन्हे केले आहेत. यामध्ये काही गुन्हे बाहेरील पोलीस ठाण्याकडे ही दाखल आहेत.
यामध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवणे, घरात घुसून मारहाण करणे, या गुन्हयांचा समावेश आहे. आज अखेर त्याच्या विरुध्द 13 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तत्कालीन पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी सन 2021 मध्ये त्याच्यासह अन्य आरोपींवर मोका दाखल केला होता. पण मोकातील फिर्यादी फित्तूर झाल्याने त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यानंतर ही त्याचे कारनामे सुरुच होते. पालकरला महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 अन्वये 2 वर्षे हद्दपारही केले होते. अशा या सराईत गुंडाचा अगदी किरकोळ कारणावरुन गेम झाला. या प्रकरणी करण जाधवने इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली. तपास सहा.पोलीस निरीक्षक किरण दीडवाघ करीत आहेत.
पत्नी, मुलाचा आक्रोश
पालकर यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान त्याची पत्नी, मुलगा व नातेवाईक बाहेर थांबले होते. डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेताना मृतदेहाकडे धाव घेत, पत्नी व मुलाने आक्रोश केला.
सलग दुसऱ्या दिवशी खून
बुधवारी मध्यरात्री वाघवाडी फाटा येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून सौरभ राजेंद्र केर्लेकर (30 रा. माळगल्ली) याचा दोघांनी खून केला. या खूनातील आरोपींना अटक करुन पोलीस सावरत असतानाच गुरुवारी भर दुपारी, भर बाजारपेठेत पालकरचा खून झाल्याने शहर हादरले.