निशांत देवची आगेकूच
वर्ल्ड ऑलिम्पिक क्वालिफायर बॉक्सिंग स्पर्धा
निशांत देव/ वृत्तसंस्था/ बुस्टो अर्सिझिओ, इटली
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविणारा भारतीय बॉक्सर निशांत देवने जॉर्जियाच्या मुष्टियोद्ध्याचा पराभव करून येथे सुरू असलेल्या पहिल्या वर्ल्ड बॉक्सिंग क्वालिफायर स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
71 किलो वजन गटाच्या लढतीत जॉर्जियाच्या मॅडिएव्ह एस्केरखानवर 5-0 अशी एकतर्फी मात करीत आगेकूच केली. निशांतच्या ठोसेबाजीपुढे एस्केरखानचा टिकाव लागला नाही. दुसऱ्या फेरीत त्याने सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण निशांतने त्याला तशी संधीच दिली नाही. निशांतची पुढील लढत रविवारी होणार आहे.
युवा वर्ल्ड चॅम्पियन अंकुशिता बोरो (66 किलो) व राष्ट्रीय चॅम्पियन संजीत (92 किलो) यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. अंकुशिता संघर्षपूर्ण लढतीत फ्रान्सच्या सोनविको एमिलीकडून 3-2 असे पराभूत झाली तर संजीत कझाकच्या ऐबेक ओरलबेकडून 0-5 असे पराभूत झाले. या स्पर्धेत भारताच्या बॉक्सर्सकडून निराशाजनक प्रदर्शन झाले आहे. ऑलिम्पिकसाठी एकूण 49 कोटा स्थाने या स्पर्धेतून मिळणार आहेत. भारताने याआधीच चार कोटा स्थाने मिळविली असून त्यात निखत झरीन, प्रीती, परवीन हुडा, लवलिना बोर्गोहेन यांनी पात्रता मिळविली आहे.