निरज चोप्रा विजेता
वृत्तसंस्था / बेंगळूर
शनिवारी येथे झालेल्या पहिल्या निरज चोप्रा क्लासीक आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत निरज चोप्राने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजेतेपद पटकाविले. निरजने या स्पर्धेत 86.18 मी.चा भालाफेक केला. या स्पर्धेत केनियाचा ज्युलीयस येगो दुसऱ्या स्थानावर तर लंकेचा रुमेश पथीरगे तिसऱ्या स्थानावर राहिले.
भारताचा जागतिक दर्जाचा भालाफेकधारक तसेच ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दोनवेळा पदक मिळविणारा निरज चोप्राने आपल्या देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ भालाफेक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये विदेशातील काही अव्वल स्पर्धक सहभागी झाले नाहीत.
निरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात 82.99 मी.चा भालाफेक त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 86.18 मी., तिसऱ्या प्रयत्नात 84.07 तर चौथ्या आणि शेवटच्या प्रयत्नात 82.22 मी.चे अंतर नोंदविले. मात्र पहिल्या आणि तिसऱ्या प्रयत्नात त्याचा फाऊल झाल्याने दुसऱ्या प्रयत्नातील 86.18 ही सर्वोच्च कामगिरीची दखल घेत त्याला विजेता म्हणून घोषित करण्यात आले.
केनियाच्या ज्युलीयस येगोने या स्पर्धेत दुसरे स्थान पटकाविले. त्याने पहिल्या प्रयत्नात 79.97 मी., दुसऱ्या प्रयत्नात 80.07 मी., तिसऱ्या प्रयत्नात 79.73 मी., चौथ्या प्रयत्नात 84.51 मी. तर पाचव्या प्रयत्नात 82.45 मी.चा भालाफेक केली. लंकेच्या रुमेश पथीरगेने तिसरे स्थान मिळविताना पहिल्या प्रयत्नात 71.19 मी., दुसऱ्या प्रयत्नात 81.90 मी., तिसऱ्या प्रयत्नात 84.34 मी., चौथ्या प्रयत्नात 80.10 मी., तर पाचव्या प्रयत्नात 77.23 मी.ची नोंद केली. त्याचा तिसरा प्रयत्न फाऊल ठरविण्यात आला.
सदर स्पर्धा विश्व अॅथलेटिक्स अ दर्जाची म्हणून ओळखली गेली. या स्पर्धेला शौकिनांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बेंगळूरमध्ये पावसाळी वातावरण असूनही सुमारे 15 हजार क्रीडाशौकिन उपस्थित होते. a