टेक समिटमध्ये ‘निपूण कर्नाटक’ची घोषणा
आघाडीच्या कंपन्यांच्या भागीदारीतून कुशल कर्मचारी घडविणार : व्यावसायिक कौशल्यावर राज्य सरकारचे लक्ष केंद्रित
बेंगळूर : राज्य सरकारने व्यावसायिक कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केले असून ‘निपूण कर्नाटक’ योजनेची घोषणा केली आहे. बेंगळूरमध्ये सुरू असलेल्या तंत्रज्ञान परिषदेच्या (टेक समिट-2025) दुसऱ्या दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. भविष्यासाठी कुशल कर्मचारी घडविण्याच्या उद्देशाने आघाडीच्या कंपन्यांच्या भागीदारीतून ही योजना राबविली जाणार आहे. कुशल कर्मचाऱ्यांची अधिक मागणी असणारी क्षेत्रे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर सुरक्षा, डेटा सायन्समध्ये प्रशिक्षण देणे हा निपूण कर्नाटक योजनेचा उद्देश आहे. याचा परिणाम म्हणून 2,800 रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
सुमारे 4,000 युवकांच्या व्यावसायिक कौशल्यामध्ये वाढ करणारा हा कार्यक्रम असून दूरगामी परिणाम करणारा ठरेल, असा सरकारचा दावा आहे. कॅपजेमिनी, वेल्स फार्गो, स्टँडर्ड चार्टर्ड आणि सुमेरी यासारख्या प्रतिष्ठित कंपन्यांचे कर्मचारी या योजनेंतर्गत प्रशिक्षण देतील. आसीटी अकादमी, एआरडब्ल्यूएस, फ्युएल व एआयएसईसीटी या प्रशिक्षण भागीदार कंपन्या आहेत. अतिरिक्त 10 हजार युवकांचे कौशल्य वृद्धीसाठी आयटी, जैविक तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम डिझाईन अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग, बँकींग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनीही प्रशिक्षण देण्यात रस दाखविला आहे.
नाविन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन
राज्य सरकारच्या इलेक्ट्रॉनिक खात्याने टेक समिटमध्ये 50 नाविन्यपूर्व उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्यामुळे येथे भेट देणाऱ्यांचे लक्ष आकर्षित झाले आहे. आयटी, कृषी, वैद्यकीय तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप टेक, आयओटी, सायबर सुरक्षा, एरोस्पेस आणि संरक्षण, फसवे व्यवहार रोखणारे अॅप हे येथील प्रमुख आकर्षण आहे. गुरुवार 20 नोव्हेंबर हा बेंगळूर तंत्रज्ञान परिषदेचा शेवटचा दिवस असून अनेक कंपन्यांशी सरकारकडून गुंतवणूक करार होतील. यावेळी देखील मोठ्या प्रमाणवर भांडवल गुंतवणूक करार होण्याची शक्यता आहे.
कचरा वर्गीकरणासाठी ‘एआय डस्टबिन’ची निर्मिती
कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी जिथे कचरा जमा होतो, तेथेच तो वेगळा केला पाहिजे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी अनेक अभियान राबवून देखील अपेक्षित यश आलेले नाही. त्यामुळे आता एआय आधारित डस्टबिन तयार करण्यात आले आहे. बेंगळूरमधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात आयोजित तंत्रज्ञान परिषदेत एआय आधारित डस्टबिन प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. एआय आधारित डस्टबिन मशिनमध्ये 6 कप्पे आहेत. टाकावू वस्तू मशिनसमोर धरली असता ती वस्तू प्लास्टिकची आहे की काचेची? ओला कचरा आहे की अन्य कोणती? हे एआय सेन्सरच्या माध्यमातून ओळखून त्यानुसार त्या कप्प्यात जमा करेल. बेंगळूरच्या एआय स्मार्ट बिन प्रा. लि. कंपनीने हे एआय आधारित डस्टबिन मशिन तयार केले आहे. या उत्पादनाला ‘बिन प्रो’ असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात विमानतळ, रेल्वेस्थानके आणि मॉलना याचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. 400 लिटर क्षमतेच्या ‘बिन प्रो’ची किंमत 40 हजार रु ते 1.5 लाख रु. दरम्यान असू शकेल.