नऊ वर्षीय कपिलची झेप
वृत्तसंस्था / भुवनेश्वर
येथे सुरू असलेल्या किट आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत नवव्या फेरीतील झालेल्या डावात दिल्लीचा 9 वर्षीय बुद्धिबळपटू आरित कपिलने अमेरिकेचा ग्रॅन्डमास्टर रॅसेट झीटडिनोव्हचा पराभव केला. अलिकडच्या कालावधीत जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात भारतीय बुद्धिबळपटूंची कामगिरी सातत्याने दर्जेदार होत आहे.
आरित कपिलचे वय 9 वर्षे 2 महिने आणि 18 दिवस असे असून बुद्धिबळ क्षेत्रात ग्रॅन्डमास्टरला क्लासीकल कालावधी नियंत्रणात पराभूत करणारा तो भारताचा सर्वात तरुण बुद्धिबळपटू असून जगातील तो तिसरा युवा बुद्धिबळपटू ठरला आहे.
बुद्धिबळक्षेत्रात ग्रॅन्डमास्टरला पराभूत करणारा भारतीय वंशाचा सिंगापूरमधील बुद्धिबळपटू अश्वथ कौषिक हा सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू आहे. त्याने आपल्या वयाच्या 8 वर्षे आणि 6 महिने झाले असताना हा पराक्रम करताना पोलंडच्या ग्रॅन्डमास्टरचा स्टुपाचा पराभव केला होता. आरित कपिलने भुवनेश्वरमधील या स्पर्धेत नवव्या फेरीत 66 वर्षीय ग्रॅन्डमास्टर झिटाडिनोव्हला 63 व्या चालीत पराभूत केले.