For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नैतिक पोलीसगिरी प्रकरणी नऊ जणांना अटक

12:10 PM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
नैतिक पोलीसगिरी प्रकरणी नऊ जणांना अटक
Advertisement

भाऊ-बहीण असल्याचे सांगूनही बेदम मारहाण : तलाव परिसरात फिरायला येणाऱ्यांवर गुंडांची नेहमीच पाळत

Advertisement

बेळगाव : किल्ला तलाव परिसरात शनिवारी झालेल्या नैतिक पोलीसगिरी प्रकरणी मार्केट पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन अल्पवयीनांचा समावेश आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी नैतिक पोलीसगिरीला थारा देऊ नये यासाठी या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली जात आहे. गौंडवाड, ता. बेळगाव येथील सचिन मल्लाप्पा लमाणी (वय 20) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून सतराहून अधिक जणांवर भादंवि 143, 147, 148, 323, 342, 307, 394, 354, 504, 506, सहकलम 149 व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत एकूण 9 जणांची धरपकड करण्यात आली असून उर्वरित संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर, मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश दामण्णावर, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी रात्रीपासूनच धरपकडीचे सत्र सुरू केले आहे.

रविवारी दुपारी किल्ला तलाव परिसरात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींना नेऊन घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या टोळक्याने आणखी काही तरुणांवर हल्ला केल्याचे पोलीस तपासात सामोरे आले असून या प्रकरणांचीही माहिती घेण्यात येत आहे. ध्वजस्तंभापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये कोंडून तरुणावर रॉडने हल्ला करण्यात आला आहे. तर तरुणीला जवळच असलेल्या एका घरात नेऊन मारहाण करण्यात आली आहे. पोलीस दलाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. तरुण व तरुणीवर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कायद्याचा हिसका दाखविण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी पत्रकारांना सांगितले. मार्केट एसीपी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी कारवाईची माहिती दिली. नऊ जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित संशयितांचा शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

अटकेतील काही जण दुबई, पुणे येथे नोकरीला

अटक करण्यात आलेल्या नऊ जणांपैकी काही जण दुबई, पुणे येथे नोकऱ्या करतात. महम्मदहुसेन ऊर्फ सैबाज नूरअहमद इनामदार, रा. व•र छावणी रामनगर, अतिफअहमद अब्दुलमजीद शेख (वय 22) रा. पंजीबाबा शिवाजीनगर, महम्मदअमन गुलामहुसेन चाबूकस्वार (वय 27) रा. आझादनगर, सैफअली नसीममुलगनी इस्माईल मगदूम (वय 27) रा. रामनगर, उमर सादिक बडेघर (वय 19) रा. वीरभद्रनगर, रिहान महम्मदगौस रोटीवाले (वय 19) रा. कॅम्प, अजान अबेदिन कालकुंद्री (वय 19) रा. वीरभद्रनगर अशी त्यांची नावे आहेत.

टोळक्यांमुळे किल्ला तलाव परिसर असुरक्षित

सचिन लमाणी व त्याची 22 वर्षांची मावस बहीण शनिवारी युवानिधी योजनेचे अर्ज भरण्यासाठी बेळगावला आले होते. त्यावेळी किल्ला तलावाजवळील ध्वजस्तंभाकडे जाऊन हे दोघे फोटो काढून घेत होते. त्यावेळी सचिनने आपल्या कपाळावर टिळा लावला होता. तर त्या तरुणीने चेहऱ्याला कपडा बांधला होता. यावरून मुस्लीम तरुणीला घेऊन का आलास? अशी विचारणा करीत सचिनला टोळक्याने मारहाण केली. आपण दोघे भाऊ-बहीण आहोत, असे वारंवार सांगूनही त्यांचे ऐकले गेले नाही. ध्वजस्तंभापासून जवळच असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये कोंडून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. नैतिक पोलीसगिरीच्या या घटनेने खळबळ माजली असून अशा टोळक्यांमुळे किल्ला तलाव परिसर असुरक्षित बनला आहे.

Advertisement
Tags :

.