पुण्यात नऊ मजुरांना डंपरने चिरडले
- वाघोली येथे पदपथवर अपघाताचा थरार: दोन चिमुरड्यांसह तरुणाचा मृत्यू
वार्ताहर / पुणे
पुण्यातील पदपथवर झोपलेल्या मजुरांच्या कुटुंबातील नऊ जणांना भरधाव डंपरने चिरडल्याने दोन चिमुरड्यांसह एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जखमींवर ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना वाघोली येथील केसनंद फाटा चौकात सोमवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास घडली. पदपथावर 12 जण झोपले होते. त्यातील तिघे बालंबाल बचावले. डंपर चालकास अटक करण्यात आली असून त्याने मद्यपान केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
या अपघातात विशाल विनोद पवार (वय 22), वैभवी रितेश पवार (1) आणि वैभव रितेश पवार (2, सर्व रा. अमरावती) यांचा मृत्यू झाला. तर जानकी दिनेश पवार (21), रिनिशा विनोद पवार (18), रोशन शशादू भोसले (9), नागेश निवृत्ती पवार (27), दर्शन संजय वैराळ (18), आलिशा विनोद पवार (47) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी डंपरचालक गजानन शंकर तोटरे (26, सध्या रा. केसनंद ता. हवेली, मूळ रा. पाळा, ता. मुखेड, जि. नांदेड) याला अटक केली आहे. त्याच्याविऊद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीरेंद्र भोसले (45, मूळ रा. सारवाडी देववाडी, ता. कारंजा घाडगे जि. वर्धा ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे अमरावती जिह्यातील असलेल्या 22 जणांचा ग्रुप कामाच्या शोधात रविवारी वाघोली भागात आला होता. ते सर्व केसनंद फाटा चौकात पदपथावर झोपले. यावेळी डंपरचालक गजानन तोटरे हा खडी घेऊन केसनंद चौकातून पोलीस ठाण्यामागील रस्त्याने एका साइटवर गेला होता. तेथे खडी उतरवल्यावर तो पुन्हा केसनंदकडे चालला होता. चौकातून केसनंदकडे वळण घेताच त्याची गाडी थेट पदपथावर आली. तेथे विशाल, वैभवी आणि वैभव यांच्या थेट अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा जणांना डंपरचे चाक घासून गेले. जखमींचा आक्रोश ऐकताच समोरच्या वाघोली पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि तेथेच पाल टाकून असलेल्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने जवळील खासगी ऊग्णालयात जखमींना दाखल केले. यानंतर त्यांना सकाळी ससून ऊग्णालयात हलवण्यात आले.
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करुन सूचना दिल्या. त्यानंतर डंपर चालकाला अटक करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, चालकाने मद्य प्राशन करीत वाहन चालवल्याचे तपासातून समोर आले आहे.