नौदलाच्या स्पीड बोटच्या भीषण धडकेत 13 ठार
एलिफंटा फेरी बोट धडकल्यानंतर बुडाली; 99 प्रवाशांची सुटका
मुंबई : प्रतिनिधी
गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटाकडे प्रवासी घेऊन जाणारी ‘नीलकमल’ नावाची फेरीबोट बुधवारी दुपारी नौदलाच्या पेट्रोलिंग स्पीड बोटीला धडकल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण दुर्घटनेत जवळपास 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 10 प्रवासी, 1 नौदल अधिकारी आणि बोटीवरील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महेश अँड ट्रॅव्हल्स कंपनीची ‘नीलकमल’ फेरीबोट नेहमीप्रमाणे गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा बेट दरम्यान प्रवासी वाहतूक करत होती. बुधवारी दुपारी 2.45 वाजता ही बोट 90 हून अधिक प्रवाशांसह एलिफंटाकडे रवाना झाली होती. मात्र, उरणजवळील कारंजा परिसरात नौदलाच्या पेट्रोलिंग करणाऱ्या स्पीड बोटीचे नियंत्रण सुटल्याने ती ‘नीलकमल’ बोटीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की प्रवासी बोट उलटून काही क्षणांतच समुद्रात बुडाली.
बचावकार्याची जोरदार शर्थ
घटनेची माहिती मिळताच नौदल, सागरी पोलीस आणि कोस्टगार्डच्या टीमने घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. 11 नौदलाच्या बोटी, 3 सागरी पोलिसांच्या बोटी, 1 कोस्टगार्ड बोट आणि 4 हेलिकॉप्टर्सच्या मदतीने तब्बल 99 प्रवाशांना वाचवण्यात यश आले. मात्र बचाव कार्य करण्यात आलेल्या प्रवाशांना जेएनपीटी, नेव्ही डॉकयार्ड, अश्विन रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय आणि करंजे येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
39 सेकंदांचा व्हिडिओ अपघाताचा साक्षीदार
फेरी बोटीतील एका प्रवाशाने या भीषण अपघाताचा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हिडिओमध्ये नौदलाची पेट्रोलिंग स्पीडबोट सरळ पुढे जात असताना अचानक मागे वळते आणि ती ‘नीलकमल’ फेरी बोटीच्या दिशेने वेगाने धडकताना दिसते. हा 39 सेकंदांचा व्हिडिओ दुर्घटनेचा साक्षीदार ठरला आहे.
इंजिन चाचणी सुरू असल्याचा दावा
भारतीय नौदलाच्या माहितीनूसार, करंजा बंदराच्या जवळ स्पीडबोट इंजिन चाचणीवर होती. या दरम्यान तिचे नियंत्रण सुटल्याने ती नीलकमल फेरी बोटीला धडकली. यानंतर नौदल, कोस्टगार्ड आणि नागरी नौकांनी तातडीने बचावकार्य राबवत प्रवाशांची सुटका केली.
सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी
या दुर्घटनेने प्रवासी जलवाहतुकीतील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बोटींवर नियंत्रण तंत्र अधिक मजबूत करणे आणि प्रवासी सुरक्षेसाठी काटेकोर नियमावली तयार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.