महिलेच्या गर्भाशयात नऊ भ्रूण
अर्भकाचा जन्म ही निश्चितच एक आनंदारची घटना आहे. एखाद्या महिलेला ‘जुळे’ होणे हा कौतुकाचा विषय असतो. ‘तिळे’ होणे ही घटना दुर्मिळ आणि अत्यंत आश्चर्याची मानली जाते. तथापि, इजिप्तमध्ये एका महिलेल्या गर्भाशयात एक, दोन किंवा तीन नव्हेत, तर 9 भ्रूण वाढत आहेत, असे समजून आले आहे. अशी घटना अतिदुर्मिळ असते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा महिलांची सातत्याने वैद्यकीय चिकित्सा करावी लागते. इतक्या संख्येने भ्रूण गर्भाशयात वाढत असणे, हे त्या भ्रूणांसाठी आणि मातेसाठीही चिंतेचा विषय ठरु शकते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गर्भाशयात दोन किंवा जास्तीत जास्त तीनपेक्षा अधिक भ्रूण राहू शकत नाहीत. जेव्हा त्यांची संख्या यापेक्षाही अधिक असते, तेव्हा तो चिंतेचा विषय असतो. अनेकदा गर्भवती महिला स्वत: यासाठी जबाबदार असतात. त्यांनी गर्भधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या मताने औषधे किंवा गोळ्या घेतलेल्या असतात. अंडाशयाला उत्तेजित करणारी औषधे डॉक्टरांना न विचारता घेतल्यास असे होऊ शकते. ही औषधे अंडाशयात आवश्यकतेपेक्षा अधिक स्त्रीबीजे निर्माण करण्यासाठी त्याला प्रेरणा देतात. त्यामुळे मोठ्या संख्येने स्त्रीबीजांचे फलन होऊन अनेक भ्रूण निर्माण होऊ शकतात.
टेस्ट ट्यूब बेबी किंवा आयव्हीएफ प्रक्रेयेतही असे होण्याची शक्यता असते. म्हणून डॉक्टर्स ही शक्यता टाळण्यासाठी एक किंवा दोन स्त्रीबीजांचेच फलन करुन त्यांना गर्भाशयात स्थापन करतात. महिलांनी गर्भधारणा होण्यासाठी इंटरनेटवरुन किंवा अन्य मार्गांनी माहिती घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:वर प्रयोग करु नयेत, असे तज्ञांचे मत आहे. ईजिप्तच्या ज्या महिलेच्या गर्भाशयात नऊ भ्रूण वाढत आहेत, तिने या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिचा आणि तिच्या गर्भाशयातील भ्रूणांचाही धोका वाढला आहे. योग्य वैद्यकीय सल्ला न घेता असे प्रकार केल्यास नंतर पस्तावण्याची वेळ येते, हे प्रत्येक महिलेने आणि तिच्या कुटुंबियांनीही लक्षात घेण्याची आवश्यकता या निमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे. ईजिप्तमधील हे उदाहरण अन्यांसाठीही मार्गदर्शक ठरणारे आहे, असे मत या महिलेल्या डॉक्टरांनी स्वत:च व्यक्त केले आहे.