निखत झरीनच्या मोहिमेला विजयाने प्रारंभ
वृत्तसंस्था/ हैदराबाद
महिलांच्या इलाईट मुष्टियुद्ध स्पर्धेतील पहिल्याच दिवशी भारताची महिला मुष्टियोद्धी निखत झरीनने आपल्या मोहिमेला विजयाने प्रारंभ केला. महिलांच्या 48-51 किलो वजन गटातील पहिल्याच फेरीच्या लढतीत निखतने उत्तर प्रदेशच्या रश्मी शर्माचा 4-1 अशा गुण फरकाने पराभव केला.
या स्पर्धेत महिलांच्या 57-60 किलो वजन गटातील पहिल्या फेरीच्या सामन्यात हरियाणाच्या अंजलीने विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या मनिषा मौनचा पराभव केला. हरियाणाच्या नितूने महिलांच्या 45-48 किलो वजन गटातील पहिल्या लढतीत उत्तर प्रदेशच्या रजनी सिंगचा 5-0, तेलंगणाच्या याशी शर्माने तामिळनाडूच्या के. मोनिषाचा 60-65 किलो वजन गटातील पहिल्या लढतीत 5-0 असा फडशा पाडत पुढील फेरी गाठली. महिलांच्या 51-54 वजन गटातील पहिल्या लढतीत लक्ष्मीने उत्तर प्रदेशच्या रागिणीचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. सदर स्पर्धा 10 विविध वजन गटात खेळवली जाणार असून प्रत्येक गटातील सुवर्ण आणि रौप्यपदक मिळविणाऱ्या स्पर्धकांची पतीयाळा येथे होणाऱ्या इलाईट राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड केली जाईल.