निखत विजयी तर लवलिना, गुलिया पराभूत
वृत्तसंस्था/ लिव्हरपूल (ब्रिटन)
येथे सुरु असलेल्या विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची महिला स्पर्धक निखत झरीनने शानदार विजय नोंदवित पुढील फेरी गाठली. मात्र लवलिना बोर्गोहेन आणि हितेश गुलिया तसेच संजू खात्रू यांचे आव्हान मात्र समाप्त झाले.
या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी बिगर मानांकित 29 वर्षीय निखत झरीनने महिलांच्या 51 किलो वजन गटात अमेरिकेच्या जेनिफर लोझानोचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. आता निखत झरीनचा पुढील फेरीतील सामना जपानच्या युना निशिनेकाशी होणार आहे.
महिलांच्या 75 किलो वजन गटातील लढतीत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणारी भारताची लवलिना बोर्गोहेन हिला तुर्कीच्या बुसेरा इस्लिदारने 0-5 असे एकतर्फी पराभूत केले. पुरुषांच्या 70 किलो वजन गटात भारताच्या हितेश गुलियाला नेदरलँड्सच्या फिन रॉबर्ट बॉसने पराभूत केले. या लढतीत बॉसने गुलियाचा 4-1 अशा गुणांनी पराभव केला. गुलियाला या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. ब्राझील आणि कझाकस्तान येथे यापूर्वी झालेल्या विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेत गुलियाने अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक मिळविले होते. पुरुषांच्या 60 किलो वजन गटात पोलंडच्या अॅनेटा रिगेलेस्काने संजू खात्रूचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.