किरावळा-आंबेवाडीतील रात्रीचा विद्युतपुरवठा पूर्ववत होणार
वार्ताहर/गुंजी
हत्तींच्या वावरामुळे सुरक्षेच्या कारणास्तव किरावळा, आंबेवाडी या गावचा विद्युत पुरवठा गेल्या चार-पाच दिवसांपासून रात्रीच्या वेळी खंडित करण्यात येत होता. कारण जंगल भागातून गेलेल्या वीजवाहिन्या उंच खांबाअभावी कमी उंचीवरून गेल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी वावरणाऱ्या हत्तींना यापासून धोका असल्याचे कारण पुढे करून या दोन्ही गावचा विद्युत पुरवठा रात्रीचे वेळी बंद करण्यात येत होता. त्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांसह नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
या विषयीची खरमरीत बातमी ‘हत्तींच्या धास्तीने किरावळा, आंबेवाडी गावे रात्रभर अंधारात’ या मथळ्याखाली ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेत हेस्कॉमने सदर ठिकाणी तातडीने उंच खांब रोवून त्या गावचा विद्युत पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे आता या गावचा विद्युत पुरवठा रात्रीच्या वेळीही सुरू राहणार असल्याचे हेस्कॉमच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे गावकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.