पंतप्रधान मोदींना नायजेरियाचा सर्वोच्च सन्मान
राणी एलिझाबेथनंतर हा सन्मान मिळविणारी पहिली व्यक्ती : आतापर्यंत 15 देशांकडून गौरव
वृत्तसंस्था/ अबुजा
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या नायजेरिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांच्याशी रविवारी राष्ट्रपती भवनात बैठक घेतली. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. याचदरम्यान नायजेरियाने पंतप्रधान मोदींना ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाने सन्मानित केले. मोदींना मिळालेला हा आतापर्यंतचा 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे ते दुसरे परदेशी नेते आहेत. एलिझाबेथ यांना हा सन्मान 1969 मध्ये देण्यात आला होता. आतापर्यंत 15 देशांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले आहे. यापूर्वी 14 नोव्हेंबर रोजी पॅरेबियन देश डॉमिनिकाने मोदींना सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ देण्याची घोषणा केली होती. कोविड-19 महामारीच्या काळात डॉमिनिकाला मदत केल्याबद्दल त्यांचा सन्मान केला जाईल. 21-22 नोव्हेंबर रोजी गयाना दौऱ्यात मोदींचा सन्मान करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी पाच दिवसांच्या विदेश दौऱ्यावर असून शनिवारी रात्री पहिल्यांदा नायजेरियाला पोहोचले. गेल्या 17 वर्षांत भारतीय पंतप्रधानांची नायजेरियाला ही पहिलीच भेट आहे. मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर भारतीय नागरिकांची गर्दी झाली होती. हातात तिरंगा घेऊन त्यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. नायजेरियाचे राष्ट्रपती बोला टिनुबू हेही पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी अबुजा विमानतळावर पोहोचले होते. औपचारिक स्वागतानंतर मंत्री न्यसोम विके यांनी अबुजा शहराच्या चाव्या पंतप्रधान मोदींना सुपूर्द केल्या. नायजेरियामध्ये ते विश्वास आणि आदराचे प्रतीक मानले जाते.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी नायजेरियाचे राष्ट्रपती टिनुबू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. भारत-नायजेरिया द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर दोघांनीही भर दिला. यानंतर मोदींनी राजधानी अबुजामध्ये भारतीय समुदायाच्या लोकांनाही संबोधित केले.