For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एनआयएचे महाराष्ट्र-कर्नाटक-गोव्यात छापासत्र

06:16 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
एनआयएचे महाराष्ट्र कर्नाटक गोव्यात छापासत्र
Advertisement

एनआयएची शनिवारी पहाटे मोठी कारवाई : महाराष्ट्रातील पडघा- बोरिवली कारवाईच्या केंद्रस्थानी

Advertisement

मुंबई : प्रतिनिधी

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया अर्थात ‘आयएसआयएस’ किंवा इसिसच्या देशातील महाराष्ट्र-कर्नाटक-गोव्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जोरदार छापेमार केली आहे.  देशभरात 44 ठिकाणी केलेल्या छाप्यात 15 जणांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवादी संघटनेचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय असणाऱ्या पडघा-बोरिवली येथे शनिवारी एनआयएकडून सिक्रेट ऑपरेशन राबविण्यात आले.

Advertisement

या कारवाईत एनआयएने पडघा-बोरिवली गावातून इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलचा प्रमुख नेता साकीब नाचन याच्यासह 15 जणांना अटक करून त्यांना दिल्ली येथे नेले आहे. या ऑपरेशन दरम्यान एनआयएने साकीब नाचन आणि इतरांच्या घरातून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड, रिव्हॉल्वर, धारदार शस्त्रs, इसिस संबंधी कागदपत्रे, स्मार्ट फोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली.

राज्यातील अनेक ठिकाणी छापा

पडघा बोरिवलीसह एनआयएने राज्यातील पुणे कोंढवा, मिरारोड, ठाणे असे एकूण 44 ठिकाणावर एकाच वेळी कारवाई केल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले असले तरी तपास यंत्रणांकडून सर्वात मोठे ऑपरेशन पडघा-बोरिवली येथे राबविण्यात आले आहे.

अन्य तपास यंत्रणांची मदत

पडघा-बोरिवली या ठिकाणी राबविण्यात आलेल्या ऑपरेशनची तयारी मागील काही आठवड्यापासून सुरू होती. या ऑपरेशनची एनआयए, राज्य एटीएस आणि स्थानिक पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात आली होती. पडघा-बोरिवली हे गाव इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युल मुख्य ठिकाण बनले होते, या ठिकाणी शरिया कायद्याचे पालन केले जात होते, तसेच इसिस महाराष्ट्र मॉड्यूलचे सर्व सदस्य, पडघा-बोरिवली येथून कार्यरत होते अशी माहिती एनआयएच्या तपासात समोर आल्यानंतर इसिस चे महाराष्ट्र मॉड्युल उद्ध्वस्त करण्यासाठी एनआयएने हे ऑपरेशन हाती घेतले होते.

ठाणे ग्रामीण पोलीस राज्य एटीएस यांच्या मदतीने हे ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी स्थानिक पोलिसांना एनआयएच्या हाती लागलेली संशयितांच्या नावाची यादी देण्यात आली होती. या यादीनुसार संशयातावर व त्यांच्या हालचालीवर स्थानिक पोलीस आणि राज्य गुप्तचर विभागाकडून लक्ष ठेवण्यात आले होते.  शुक्रवारी मध्यरात्री पडघा-बोरिवली गावाला जवळपास 500 पोलिसांचा वेढा टाकण्यात आला, बाहेरून गावात कुणालाही जाऊ दिले जात नव्हते.

एकाच वेळी धाडसत्र

अचानक पडघा-बोरिवली गावात पोलिसांच्या धाडसत्रामुळे अनेक संशयितांच्या घरातील महिलांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक पोलिसांकडून तेथील परिस्थिती योग्यरीत्या हातळण्यात आली.

हिंसाचार घडवून आणण्याचा कट

एनआयएच्या तपासात पुढे असे समोर आले आहे की आरोपी, इसिस महाराष्ट्र मॉड्यूलचे सर्व सदस्य, पडघा-बोरिवली येथून कार्यरत होते, जिथे त्यांनी संपूर्ण भारतात दहशत पसरवण्याचा आणि हिंसाचार घडवून आणण्याचा कट रचला होता.  हिंसक जिहाद, खिलाफत, इसिस  इत्यादी मार्गाचा अवलंब करून, अटक आरोपींनी देशातील शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवणे आणि भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी ठाण्यातील पडघा हे गाव ‘मुक्त क्षेत्र‘ आणि ‘अल शाम‘ म्हणून घोषित केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

बेंगळूरमध्ये एका संशयिताला अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कर्नाटकातही एका ठिकाणी छापा टाकून एका संशयिताला अटक केली आहे. अली अब्बास असे त्याचे नाव असून कसून चौकशी केली जात आहे. बेंगळूरमध्ये फ्रेजर टाऊन येथे अली अब्बास याच्या निवासस्थानी धाड टाकण्यात आली असून 16 लाख 42 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. तो मुळचा मुंबई येथील असून टॅनरी रोडवर उर्दू शाळा चालवत होता. 2018 मध्ये त्याने बेंगळूरात फ्लॅट खरेदी केला. त्याची पत्नी डॉक्टर असून तीन मुलांसमवेत तो येथे वास्तव्यास होता. महाराष्ट्रात एनआयएने यापूर्वी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांशी संपर्क असल्याच्या आरोपावरून शनिवारी त्याच्यावर छापा टाकण्यात आला. देशात विविध ठिकाणी संचार करून दहशतवादी संघटनांच्या विचारधारेचा प्रचार केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. त्याने स्थानिक लोकांसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. त्यात आपल्या विचारांशी सहमत होणाऱ्यांना दुसऱ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करत होता. टेलिग्रामच्या साहाय्याने देखील आपल्या समर्थकांचा ग्रुप तयार करून त्याद्वारे युवकांमध्ये घातपाती कृत्यांचे विचार पेरण्याचे कारस्थान केल्याचा आरोपही अली अब्बासवर आहे.  त्याच्याजवळून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती पडताळण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.