एनआयएचे कारवारमध्ये तीन ठिकाणी छापे
सीबर्ड नौदल प्रकल्पातील गुप्त माहिती पुरविल्याप्रकरणी तिघे जण ताब्यात
कारवार : एनआयएच्या पथकाकडून बुधवारी कारवार जिल्ह्यातील तीन ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. याप्रकरणी कारवार तालुक्यातील मुदगा येथील पुनर्वसन कॉलनीतील चेतन तांडेल, तोडूर येथील सुनील नाईक आणि अंकोला तालुक्यातील हळवळ्ळी येथील अक्षय नाईक या तिघांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांवर येथून जवळच्या सीबर्ड नौदल प्रकल्पातील गुप्त माहिती चोरून पुरविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. एनआयएची कारवाई एलडीवायएसपी आणि तीन निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. एनआयएच्या कारवाईनंतर कारवार आणि अंकोला तालुक्यात खळबळ माजली आहे.या कारवाईबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, येथून काही किलोमीटर अंतरावर केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशिया खंडात सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखला जाणारा सीबर्ड नाविक दल प्रकल्प आकार घेत आहे. कारवार आणि अंकोला तालुक्याच्या किनारपट्टीवर आकार घेत असलेल्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा आकार घेत आहे.
देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीबर्ड प्रकल्पातील काही अतिशय गुप्त माहिती विदेशाला पुरविल्याप्रकरणी 2023 मध्ये हैदराबाद येथील दीपक आणि इतरांवर कारवाई करण्यात आली होती. दीपक आणि इतरांना सीबर्डमधील गोपनीय माहिती सीबर्डमध्ये सेवा बजावत असणाऱ्या चेतन, सुनील आणि अक्षय यांनी पुरविल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याबाबत काही आर्थिक व्यवहारही झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी सीबर्ड प्रकल्पात सेवा बजावणारा अक्षय आता गोव्यातील एका कॅन्टीनमध्ये सेवा बजावत होता, असे सांगण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, बँक व्यवहार आणि सीबर्डमधील त्यांच्या कामाच्या स्वरुपाची चौकशी केली जात आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांना नोटीस बजावून अधिक चौकशीसाठी एनआयएच्या टीमने गुप्तस्थळी नेले आहे. चौकशीनंतर या प्रकरणाचा अधिक उलगडा होणार आहे.