For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बनावट नोटांविरोधात एनआयएच्या धाडी

06:16 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
बनावट नोटांविरोधात एनआयएच्या धाडी
Advertisement

छपाईचा कागद हस्तगत, अनेक संशयितांना अटक

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बनावट चलनी नोटांविरोधात राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाने मोठे अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत शनिवारी देशात विविध स्थानी धाडी टाकण्यात आल्या आहेत. या धाडींमध्ये बनावट नोटा छापण्याचा कागद मोठ्या प्रमाणावर हस्तगत करण्यात आला असून अनेक नोटाही जप्त करण्यात आल्या. अनेक संशयितांना विविध राज्यांमधून अटक करण्यात आली. त्यांची सखोल चौकशी होणार आहे.

Advertisement

महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात प्रामुख्याने हे धाडसत्र चालविण्यात आले. उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर जिल्ह्यातून विवेक ठाकूर ऊर्फ आदित्य सिंग याला ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातूनही काही जणांना अटक करण्यात आली आहे. ठाकूर याच्या घरातून बनावट नोटा छापण्याचा कागद जप्त करण्यात आला. 500 रुपये, 200 रुपये आणि 100 रुपयांच्या अनेक बनावट नोटाही हस्तगत करण्यात आल्या. महाराष्ट्रातील राहुल तानाजी पाटील ऊर्फ जावेद यालाही अटक करण्यात आली असून त्याचे ठाकूरशी जवळचे संबंध आहेत, अशी माहिती एनआयएला प्राप्त झाली असे प्रतिपादन करण्यात आले.

नोटा छपाईचे यंत्र जप्त

हे सर्व संशयित बनावट नोटांचा व्यवहार करण्यासाठी बनावट सिमकार्डस्चा उपयोग करीत होते. बनावट सिमकार्डांच्या माध्यमातून पैसे घेऊन बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर पुरविल्या जात होत्या. महेंदर नावाच्या संशयिताच्या घरातून बनावट नोटांचे मुद्रण करण्याचे यंत्र प्राधिकरणाने हस्तगत केले आहे.

नोटांच्या शोधाला प्रारंभ

संशयितांनी बनावट नोटा कोणाकोणाला पुरविल्या आहेत, याची माहिती घेण्यात येत आहे. ती मिळाल्यानंतर या नोटांचाही शोध हाती घेण्यात येणार आहे. संशयित लोक ज्या सिमकार्डाच्या आधारावर बनावट नोटांचे व्यवहार करीत होते, ती सिमकार्डेही बेकायदेशीर मार्गाने मिळविण्यात आली होती. येत्या काही दिवसांमध्ये आणखी धाडी घालण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.