दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएकडून परप्पन कारागृहात चौकशी
बेंगळूर : संपूर्ण देश हादरवून सोडलेल्या दिल्लीतील कार बॉम्बस्फोट प्रकरणाचा संबंध बेंगळूरमधील परप्न अग्रहार कारागृहाशी आहे का, याचा तपास केला जात आहे. गुरुवारी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी परप्पन कारागृहाला भेट देऊन काही संशयितांची चौकशी केली आहे. त्यामुळे तर्कवितर्क व्यक्त होत आहे. नवी दिल्लीहून बेंगळूरला आलेल्या एनआयएच्या पथकाने परप्पन अग्रहार कारागृहातील संशयित दहशतवादी आणि गुडांची कसून चौकशी केली. तसेच दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कटात त्यांचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कारागृहात असलेल्या आयएसआयएस संघटनेचा संशयित दहशतवाद्याने कारागृहातून सॅटेलाईट फोनचा वापर केल्याने गोंधळ निर्माण झाला होता. राज्यातील काही युवकांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रेरित करत असल्याचा आरोप प्रकरणी दहशतवाद्यांच्या यादीतील जुहाब मुन्ना उर्फ जुहाद हमीद शकील मुन्ना याला 2020 मध्ये दुबईत अटक झाली होती. काही दिवसांपूर्वी परप्पन अग्रहार कारागृहात सॅटेलाईट फोनचा त्याने वापर केला होता. काही संशयास्पद व्यक्तींशी तो संभाषण करीत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे त्याचे दिल्ली स्फोटाशी कनेक्शन आहे का, याचा तपास केला जात असल्याचे समजते.