जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएची कारवाई, 12 ठिकाणी छापे
श्रीनगर :
एनआयएने पाकिस्तानशी संबंधित दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या घटनांची दखल घेत मोठी कारवाई केली आहे. सीमेपलिकडून घुसखोरीच्या घटना वाढल्यावर एनआयएने जम्मूमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले आहेत. दहशतवादी गटांना मदत करणाऱ्या ओव्हरग्राउंड वर्कर्सवर कारवाई करण्यात आली आहे. हे ओव्हरग्राउंड वर्कर भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना लॉजिस्टिक्स, सुरक्षित आश्रय आणि मार्ग उपलब्ध करविण्यास मदत करतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी एनआयएने मागील वर्षी 24 ऑक्टोबर रोजी झालेल्या घुसखोरीशी संबंधित घटनांप्रकरणी या ओव्हरग्राउंड वर्कर्सविरोधात गुन्हे नोंदविले होते. या ओव्हरग्राउंड वर्कर्सनी आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीद्वारे भारतात पोहोचलेल्या लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना मदत पुरविली होती. जम्मू क्षेत्रातील गावांमध्ये राहणारे ओव्हरग्राउंड वर्कर्स आणि अन्य दहशतवादी गटांनी या घुसखोरांना मदत केली होती. या दहशतवाद्यांना अन्न, निवारा आणि पैसेही देण्यात आले होते. संशयित हायब्रीड दहशतवादी आणि ओव्हरग्राउंड वर्कर्स हे बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांशी जोडले गेलेले आहेत असेही अधिकाऱ्याने सांगितले आहे. याचदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी चालू वर्षात आतापर्यंत तीन बैठका घेतल्या आहेत.